पॅनेक्स-21: बिमस्टेक देशांनी पाहिली भारतीय लष्कराची अतुलनीय क्षमता!

123

बिमस्टेक या संघटनेच्या सदस्य राष्ट्रांसाठी पुण्याच्या लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय (सीएमई) येथे आयोजित पॅनेक्स-21 या मानवता मदत आणि आपत्कालीन सुटका (HADR) विषयावरील सराव कार्यक्रमात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बहुसंस्थात्मक सरावाचे निरीक्षण केले. तसेच एका संरक्षण सामुग्री प्रदर्शनाचे उद्घाटनही केले. एखाद्या प्रदेशात ओढवलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी चपळाईने, समन्वयाने वेगाने मदत आणि बचावकार्य करण्याच्या भारतीय लष्कराच्या क्षमतेचे संरक्षमंत्र्यांनी निरीक्षण केले. भारतीय लष्कर, नौदल आणि वायुदलाकडून समन्वयाने केले जाणारे मदत आणि बचावकार्य यावेळी सादर करण्यात आले. यासाठी कृत्रिमपणे आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण केली होती. सैन्यदले आणि देशातील अन्य आपत्कालीन मदतयंत्रणा एकत्रितपणे काम करून उपलब्ध संसाधनांच्या मदतीने, अडकलेल्या लोकांची कशी सुटका करतात, तसेच अत्यावश्यक सेवासुविधा आणि संपर्कव्यवस्था लवकरात लवकर कशा पूर्ववत करतात, याचे प्रात्यक्षिक यावेळी दाखवण्यात आले.

संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

अशा सरावामुळे भविष्यात चक्रीवादळे, भूकंप अशा संकटांचा तसेच कोविड-19 सारख्या आव्हानांना तोंड देण्यासाठी अधिक चांगला समन्वय साधने शक्य होईल, असा विश्वास संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केला. हिंदी महासागर क्षेत्राच्या कल्याणासाठी भारताने आखलेल्या दूरदृष्टीचा राजनाथ सिंह यांनी पुनरुच्चार केला. हा दृष्टिकोन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘सागर SAGAR (प्रदेशातील सर्वांसाठी सुरक्षितता आणि वृद्धी) संकल्पनेवर आधारित आहे. या किनारी राष्ट्रांमध्ये आर्थिक आणि सुरक्षाविषयक सहकार्य वाढण्याच्या, तसेच जमीन आणि सागरी प्रदेश सुरक्षित राखण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत असे आवाहनही त्यांनी केले. शाश्वत प्रादेशिक विकास, नील अर्थव्यवस्था, नैसर्गिक आपत्ती, चाचेगिरी, दहशतवाद अशा अपारंपरिक धोक्यांचा प्रतिकार करण्यासाठी परस्पर संबंध वृद्धिंगत करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यापैकी प्रत्येक घटकाकडे समान लक्ष देण्याची गरज आहे. मात्र त्यातही मानवी अस्तित्वाला आव्हान देणाऱ्या संकटाना, नैसर्गिक आपत्तीना प्रतिसाद देणे, हा ‘सागर’ प्रकल्पाचा सर्वात मोठा आधारस्तंभ आहे, असेही ते म्हणाले.

तटरक्षक दलाचे कौतुक

संकटकाळी मदत करण्याच्या कामाबद्दल आणि हिंदी महासागर क्षेत्रात मदतीसाठी सर्वप्रथम वेगवान प्रतिसाद देण्याबद्दल संरक्षणमंत्र्यांनी भारतीय सैन्यदलांचे तसेच तटरक्षक दलाचे कौतुक केले. संरक्षणदलांनी आणि भारतीय तटरक्षक दलाने कोविड-19 विरोधातल्या लढ्यात बजावलेल्या मोलाच्या कामगिरीचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. बंगालच्या उपसागराच्या क्षेत्रातील प्रत्येक भागीदार देशाच्या सैन्यदलाकडे ही वचनबद्धता आहेच, असे त्यांनी आवर्जून सांगितले. बिमस्टेक देशांना भविष्यकालीन संकटांना तोंड देण्यासाठी सर्व सहभागी देशांना एकत्र आणण्यात पॅनेक्स-21 मुळे नक्कीच फायदा होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

( हेही वाचा : ऑल द बेस्ट! दहावी-बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर )

यावेळी लष्करप्रमुख मनोज नरवणे, दक्षिण कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ- लेफ़्टनन्ट जनरल जे.एस. नैन आणि संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ नागरी आणि लष्करी अधिकारी उपस्थित होते. 20-22 डिसेंबर 2021 या काळात पॅनेक्स-21 चे आयोजन करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.