राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, तसेच परीक्षांच्या बाबतीतही गैरव्यवहार झाले आहेत. एसटी कर्मचा-यांचा प्रश्न टांगणीवर आहे. कोणत्याही समस्येवर योग्य तोडगा या आघाडी सरकारकडे नसल्याचे नेहमीच विरोधी पक्षाकडून बोलले जाते. आता यातच महाविकास आघाडी सरकारचे कर्तेधर्ते असणा-या शरद पवारांवर मिष्किल आणि खोचक टीका मनसेचे गजानन काळे यांनी आपल्या कवितेच्या माध्यामातून केली आहे. निवडणुकीच्या काळात पावसात भिजून भाषण देणा-या पवारांना राजकारणासाठी नको आता जनतेसाठी पावसात भिजा, अशा शब्दांत आवाहन केले आहे.
पवार साहेबांना … पुन्हा पावसात भिजावं लागणार का?#SharadPawar #शरदपवार#हिवाळी_अधिवेशन pic.twitter.com/VddyuRCuNt
— Gajanan Kale (@MeGajananKale) December 22, 2021
राजकारणासाठी नाही तर जनतेसाठी…
गजानन काळे यांनी लिहिलेल्या कवितेचे शिर्षक, “साहेब पुन्हा एकदा पावसात भिजा ना…” असे आहे. त्यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून महाराष्ट्रात सध्या चालू असलेल्या प्रश्नांवर अचूक बोट ठेवले आहे आणि त्यावर योग्य तो तोडगा काढण्यासाठी असक्षम ठरलेल्या शरद पवार आणि सरकारवर खोचक टीका केली आहे. कवितेत परीक्षांच्या बाबतीत जो राज्यात सध्या सावळा गोंधळ चालू आहे, तसेच ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण आणि एसटी कर्मचा-यांचे आंदोलन या गोष्टींवरुन सरकारला घेरले आहे.
अशी आहे कविता
ज्यांना लोकं म्हणतायत जाणता राजा..
तेच विसरलेत आज महाराष्ट्राची प्रजा ..
महाविकास आघाडी सरकारचे तुम्ही कर्तेधर्ते
पण जनता तुमच्या राजकीय कलगुती-यांमध्ये मरते..
एमपीएससी, आरोग्य भरतीचा मांडलाय बाजार
सहा महिने उलटून गेले.. विद्यार्थी झाले बेजार..
आयोग नाही कार्यान्वित.. परीक्षेचा नाही पत्ता
डोळ्यात स्वप्न बाळगणा-या पोरांची करताय तु्म्ही थट्टा ..
शाळेच्या फीत 15 टक्क्यांनी करणार होतात कपात..
नोकरी नसताना पालकांना भरावा लागतोय एकप्रकारचा जकात ..
ओबीसी आरक्षणाची फाईल आहे धूळ खात पडून
तर मराठा आरक्षणावर सरकार कोर्टात मूग गिळून..
करुन दाखवलं म्हणण्यापेक्षा..करुन दाखवा..
शेतक-याला जगवा.. एसटी कर्मचा-यांचा प्रश्न सोडवा..
नसेल जमतं तर साहेब, पुन्हा एकदा पावसाला बोलवाना…
राजकारणासाठी नाही तर, जनतेसाठी.
साहेब तुम्ही, पुन्हा एकदा पावसात भिजा ना…
( हेही वाचा : चंद्रपुरात दारुबंदीचा उच्च न्यायालय देणार का आदेश?)
Join Our WhatsApp Community