राज्याचे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. सुरू असलेले हे हिवाळी अधिवेशन २८ डिसेंबर २०२१ रोजी संपणार आहे. दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच तू तू-मैं मैं झाल्याचे पाहायला मिळाले. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्ष निवडीसह आरोग्य विभागाचा गोंधळ, म्हाडा आणि टीईटी परिक्षांवरून सरकारला चांगलेच धारेवर धरले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्ष निवडीवरून राज्य सरकारवर हल्लाबोल करताना ते म्हणाले, स्वतःच्या आमदारांवरच विश्वास नसणारे सरकार आम्ही राज्याच्या इतिहासात कधी पाहिले नव्हते.
…तर आम्ही आमची लढाई कायदेशीर पणे लढू
महाराष्ट्र विधानसभेच्या स्थापनेपासून अध्यक्ष पदाची जी प्रथा होती, ती बदलण्याचा अट्टहास का केला जातोय? असा सवाल ही फडणवीसांनी उपस्थितीत केला आहे. तसेच, तुम्ही हे रेटून नेणार असाल तर आम्ही आमची लढाई कायदेशीर पणे लढू असे आव्हानही त्यांनी दिले.
(हेही वाचा – ‘आवाजी पद्धतीने अध्यक्षांची निवड नकोच!’)
इतके असुरक्षित सरकार आजवर पाहिले नाही
ज्या सरकारकडे १७० आमदारांचे बहुमत आहे, त्या सरकारच्या मनात अध्यक्ष निवडणुकीबाबत संशय आहे. सरकारला स्वत:च्या बहुमातावर विश्वास नाही? असा सवाल फडणवीसांना यावेळी उपस्थितीत केला. महाराष्ट्राच्या इतिहासात इतके असुरक्षित सरकार मी आजवर पाहिले नाही. भाजपचे ज्येष्ठ नेते अटलजी यांनीही अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कधी व्हीप लागू केला नव्हता. त्यांच्या नावाचा चुकीचा वापर करू नका. तुमच्या भीतीसाठी कशाला खोटे बोलता? असेही ते म्हणाले.