भायखळ्यातील राणीबागेत पाच वर्षांपूर्वी आगमन झालेल्या पेंग्विन्सला आता पिल्ले होऊ लागली आहेत. यंदाच्या वर्षात पेंग्विनच्या दोन जोडप्यांना पिल्ले झालीत. त्यापैकी एक जोडप्याच्या आगमनाच्या वृत्तासह नावाचाही उलगड मुंबई महानगरपालिकेने केला. मात्र चार महिन्यांच्या दुस-या पेंग्विनचं बारसं यंदाच्या आठवड्यात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामुळे लांबणीवर गेलं आहे.
पिल्लू चार महिन्याचं झाले तरी…
कोरोनाच्या दुस-या लाटेत राणीची बाग बंद असताना १ मे रोजी ‘डॉनल्ड’ आणि ‘डेसी’ या जोडप्याला पेंग्विनचे पिल्लू जन्मले. या पेंग्विनच्या पिल्लाचे नाव ‘ओरियो’ ठेवण्यात आले. ओरियोसह अजून एक पिल्लू १९ ऑगस्ट रोजी राणीबागेत जन्मले. दुस-यावेळी ‘हम्बल्ट’ आणि ‘फ्लिपर’ला पिल्लू झाले. आता हे पिल्लू चार महिन्याचे होत आलेय. ओरियोही चार महिन्यांचा झाल्यावर त्याचे नामकरण झाले होते. त्यामुळे ‘हम्बल्ट’ आणि ‘फ्लिपर’च्या पिल्लाच्या नावाबाबत नोव्हेंबरपासून राणीबाग प्रशासन विचार करत आहे.
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी मिळणार मूहूर्त
१ नोव्हेंबर रोजी राणीबाग पर्यटकांसाठी पुन्हा खुली केल्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांच्याशी नव्या पिल्लाच्या नामकरणाविषयी चर्चा झाली होती. दरम्यानच्या काळात पिल्लाच्या नावाबाबत एकमत करण्यात राणीबाग प्रशासन गुंतले. पिल्लाच्या बारशाचा अखेर मुहूर्तही ठरला. आज मंगळवारी पेंग्विनचे बारसे होणार तेवढ्यातच हिवाळी अधिवेशनाची मुहूर्तमेढ रोवली गेली. आता पेंग्विनच्या पिल्लाच्या बारशाला कदाचित आठवड्याच्या शेवटच्या दिवशी मूहूर्त मिळेल, अशी आशा राणीबाग प्रशासनाकडून व्यक्त होत आहे.
Join Our WhatsApp Community