कोविड सेंटर आणि लसीकरणासाठी ४७ शालेय इमारती, ३७१ वर्गाचा वापर

127

मुंबईत महापालिकेच्या शाळा पुन्हा सुरु झाल्यानंतरही आजही तब्बल १९ शालेय इमारतींचा वापर कोविड सेंटरसाठी तर २८ इमारतींचा वापर कोविड लसीकरणासाठी होत आहे. कोविड लसीकरणासाठी शालेय इमारती किंवा त्यातील सभागृहांचा वापर करण्यास देताना आडकाठी घेणाऱ्या शिक्षण विभागाला आजही या शाळांमधील कोविड सेंटर आणि कोविड लसीकरणासाठी पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला करता आलेल्या नाहीत.

(हेही वाचा – राणीबागेतील पेंग्विनच्या बारशासाठी ‘तारीख पे तारीख’…)

मुंबई महापालिकेच्या शालेय इमारती आणि त्यामधील वर्गखोल्या विविध संस्थांनी अडवून ठेवल्याने शिक्षण विभागाने त्या वर्गखोल्या संबंधितांकडून ताब्यात घेण्याची प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत शिक्षण विभागाने ८३ इमारती आणि  ५७४ वर्गखोल्या तसेच ४१ सभागृहाच्या जागा या निवडणूक कार्यालय, अन्य शासकीय कार्यालय, कोविड सेंटर आणि लसीकरण तसेच कोविड काळात कैद्यांना क्वारंटाईन ठेवण्यासाठी तुरुंग म्हणून शालेय इमारती व वर्ग खोल्या वितरीत करण्यात आल्या होत्या.

…मात्र शिक्षण विभागाला यश आलेले नाही

मात्र अशैक्षणिक कामांसाठी वितरीत केलेल्या या शाळा आणि वर्ग खोल्या संबंधितांकडून परत ताब्यात घेण्यासाठी त्या रिकामी करून घेणे आवश्यक असतानाही आजवर केवळ ८३ इमारतींपैकी ६ इमारती रिकाम्या करून घेण्यात शिक्षण विभागाला यश आले आहे. तर ५७४ वर्गखोल्यांपैंकी १८ वर्गखोल्या या महापालिकेच्या ताब्यात आल्या असून आजही ५५६ वर्गखोल्या विविध संस्था आणि कार्यालयांच्या ताब्यात आहेत. तर एकूण ४१ सभागृहांच्या तुलनेत एकमेव सभागृह ताब्यात घेता आलेले आहे. कोविड सेंटरसाठी  २१ इमारती आणि ३३५ वर्गखोल्यांचा वापर होत आहे. त्यातील केवळ पूर्व उपनगरांमधील दोन इमारती आणि १० वर्गखोल्या रिकाम्या करून तिथे शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. तर कोविड लसीकरणासाठी २८ शालेय इमारती आणि ४६ वर्गखोल्या  तसेच १९ सभागृह उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यातील एकही शालेय इमारत किंवा वर्गखोली रिकामी करण्यात शिक्षण विभागाला यश आलेले नाही.

कोविड सेंटरसाठी वापरण्यात येणाऱ्या शाळा, वर्गखोल्या

  • एकूण शालेय इमारती : २१ (ताब्यात घेतले २)
  • एकूण वर्गखोल्या : ३३५ (ताब्यात घेतल्या १०)
  • एकूण शालेय सभागृह : ६ (ताब्यात एकही नाही)

कोविड लसीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या शाळा, वर्गखोल्या

  • एकूण शालेय इमारती : २८ (ताब्यात एकही नाही)
  • एकूण वर्गखोल्या : ४६ (ताब्यात एकही नाही)
  • एकूण शालेय सभागृह : १९ (ताब्यात एकही नाही)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.