दुर्दैवी! राजापूर डेपोतील निलंबित एसटी कर्मचाऱ्याच्या हृदयविकाराने मृत्यू

राजापूर डेपोत हळहळ

122

एसटी कर्मचाऱ्याचा संप संपायचं काही नाव नाही, एसटी महामंडळाच्या विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असलेले एसटी कर्मचारी अद्याप आंदोलकाच्या भूमिकेत आहेत. राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन सुरू असून संपकरी कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्तीसह निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली आहे. अशातच रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर डेपोमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एसटी महामंडळाच्या राजापूर आगारातील कर्मचारी राकेश रमेश बांते (वय ३५) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला असून ही घटना बुधवारी रात्री साडे दहा वाजता घडली.

निलंबनाच्या कारवाईचा धसका 

गेल्या ५० दिवसांपेक्षा अधिक दिवस उलटून गेले तरीही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. एसटी कर्मचारी संपात सहभागी झालेल्या संपकरी कर्मचाऱ्यावर महामंडळाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. यामध्ये राकेश रमेश बांते यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, या निलंबनाच्या कारवाईचा धसका मनात घेतल्याने राकेश बांते यांचा हृदयविकाराचा झटका आला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला असल्याचे एसटी कर्मचाऱ्यांनी सांगितले.

(हेही वाचा – ओमायक्रॉनचा विस्फोट! तामिळनाडूत एकाच वेळी ३३ जणांना बाधा)

कारवाईनंतर राकेश बांते तणावात

संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली तर काहींच्या बदल्या देखील करण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राजापूर आगारातील साधारण वीस ते पंचवीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. यामध्ये राकेश बांते यांचा देखील समावेश होता. १० डिसेंबर रोजी त्यांच्यावर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. या कारवाईनंतर ते तणावात होते. यावेळी अत्यावस्थ वाटू लागल्याने बुधवारी त्यांना राजापुरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्‍यात आले. उपचार सुरु असताना रात्री १०.३० दरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामध्ये त्यांचा मृत्‍यू झाला. राकेश बांते हे विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील होते. गेली चार वर्षे ते राजापूर आगारात कार्यरत होते. पत्नी व दोन मुलांसह राजापुरात रहात होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.