देशात कोरोना व्हायरसचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनचा शिरकाव झाल्यानंतर देशाची चिंता वाढली. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य पातळीवर पुन्हा एकदा नाईट कर्फ्यू किंवा संपूर्ण लॉकडाऊन लावण्यासंदर्भात चर्चा सुरू झाली आहे. मात्र येत्या काही दिवसांत राज्यात ओमायक्रॉनबाधित रूग्णांचा आकडा वाढता राहिल्यास नाईट कर्फ्यूची घोषणा केली जाऊ शकतो. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी गुरूवारी विधानसभेत बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी असे संकेत दिलेत. गुरुवारी विधानसभा सभागृहात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मास्क न वापरण्यावरून संताप व्यक्त केला. अजित पवार यांनी मंत्र्यांसह सर्वपक्षीय आमदारांवर आपली नाराजी व्यक्त केली. काही जणांचा अपवाद वगळता इतरांकडून मास्कचा वापर करण्यात येत नसल्याचे त्यांनी सांगितले.
(हेही वाचा- विनामास्क मंत्र्यांसह सर्वपक्षीय आमदारांना अजितदादांनी झापलं, म्हणाले…)
रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू करण्याच्या चर्चा सुरू
नुकतीच दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाची बैठक घेतली होती. देशाचे पंतप्रधान मोदी ओमायक्रॉनच्या परिस्थितीसंदर्भात गांभीर्याने विचार करत आहे. तर केंद्रीय स्तरावर नाईट लॉकडाऊनची चर्चा सुरू आहे, असे अजित पवार यांनी म्हटले. ते पुढे असेही म्हणाले, पंतप्रधान मोदी हे कोरोना संदर्भात गंभीर असून त्याबाबत बैठका घेत आहेत. काही राज्यांमध्ये रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू करण्याच्या अनुषंगाने चर्चा सुरू आहे.
महाराष्ट्रासह देशभरात पुन्हा एकदा नाईट कर्फ्यू?
कोरोनाच्या ओमायक्रॉनमुळे वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. परदेशात दीड दिवसात रुग्ण संख्या दुप्पट होत आहे. तर येत्या काळात परदेशात पाच लाख लोकांची मृत्यू होण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवली आहे. त्यामुळे काही गोष्टींचे योग्य वेळी गांभीर्य लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह देशभरात पुन्हा एकदा नाईट कर्फ्यूची घोषणा करण्यात येणार का? याकडे राज्यातील नागरिकांचं लक्ष लागले आहे.