देशातील व्हीआयपी सुरक्षेबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता प्रथमच सीआरपीएफच्या महिला कमांडो देशातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या (व्हीआयपी) सुरक्षेत रुजू होणार आहेत. यासाठी 32 महिला कमांडोना व्हीआयपी सुरक्षेचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) महिला कमांडोची पहिली तुकडी व्हीआयपी लोकांच्या सुरक्षेसाठी प्रशिक्षित करण्यात आली असून, लवकरच गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, प्रियंका गांधी वाड्रा आणि इतर व्यक्तींसोबत विविध जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी या महिला सज्ज असणार आहेत.
32 महिला कमांडो
सीआरपीएफने आपल्या व्हीआयपी सुरक्षा युनिटमध्ये 32 महिला कमांडोची पहिली तुकडी तयार केली आहे आणि आता त्यांना दिल्लीतील शीर्ष ‘झेड-प्लस’ सुरक्षा ज्यांना देण्यात आली आहे त्यांच्या रक्षणाचे काम दिले जाणार आहे. येत्या पाच राज्यांच्या निवडणुकीदरम्यान, व्हीआयपी नेत्यांच्या संरक्षणात सीआरपीएफच्या महिला कमांडो तैनात केल्या जाऊ शकतात.
या नेत्यांकडे आहे झेड प्लस सुरक्षा
व्हीआयपींच्या हाऊस प्रोटेक्शन दलात महिला कमांडो तैनात असणार आहेत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात महिला कमांडो तैनात करण्यात येणार आहेत. सीआरपीएफकडून देशातील 5 व्हीआयपींना झेड प्लस सुरक्षा दिली जात आहे. ज्या पाच व्हीआयपींना सध्या Z+ सुरक्षा देण्यात आली आहे, त्यात गृहमंत्री अमित शहा, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचा समावेश आहे.
( हेही वाचा :शक्ती कायदा मंजूर, पण खोटी तक्रार केली तर…)
Join Our WhatsApp Community