Eps95 पेंशनधारकांच्या राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने पेंशनधारकांचे बुलडाणा येथील मुख्यालयात सुरु असलेल्या साखळी उपोषणाला बुधवार, २२ डिसेंबर रोजी तीन वर्ष पूर्ण झाली. Eps95 या १९९५ मध्ये केंद्र सरकारने सर्व कामगारांना बंधनकारक केलेल्या योजनेतील तरतुदींना परस्पर फाटा देऊन अन्यायकारक दुरुस्त्या व पेंशन फंडात पैसे भरले जाऊनही ‘भिक’ दिल्याप्रमाणे पेंशन मिळत असल्याने Eps95 राष्ट्रीय संघर्ष समितीच्या नेतृत्वात तीन वर्षांपूर्वी दिल्ली येथे आमरण उपोषण सुरू केले होते, ते तत्कालीन कामगार मंत्री संतोष कुमार गंगवार ह्यांच्या मध्यस्थीने थांबवून बुलढाणा या संघर्ष समितीच्या राष्ट्रीय मुख्यालयात साखळी उपोषण सुरू ठेवले होते.
आदेश देऊन अधिकारी ढिम्मच
मध्यंतरी गेल्या दीड वर्षात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी खासदार हेमा मालिनी यांच्या मध्यस्थीने राष्ट्रीय अध्यक्ष निवृत्त कमांडर अशोक राऊत, सरचिटणीस विरेंद्रसिंह राजावत यांच्या समितीची विस्तृत चर्चा घडून आली. या चर्चेत Eps95 ची किमान पेंशन सध्याच्या १०००/- वरून ७५०० रुपये + महागाई भत्ता, अशी व्हावी व सर्वोच्च न्यायालयाने या आधीच दिलेल्या निकालानुसार उच्च वेतनावर वाढीव पेंशन मिळावी, इत्यादी मागण्यावर पंतप्रधानांनी सहमती दर्शवून यावर त्वरित कार्यवाही व्हावी, असे पंतप्रधान कार्यालयातील मंत्र्यांना बोलावून आदेश दिले आहेत. असे असले तरी अद्यापही कामगार मंत्रालयाच्या अधिकारी वर्गाने त्यावर काहीही केलेले नाही. त्यामुळे Eps95 पेंशन धारकात तीव्र असंतोष देशभर पसरला आहे. त्याची परिणती साखळी उपोषणाच्या ३ वर्ष पूर्तीमध्ये झाली. यानिमित्ताने आयोजित सभेत उपोषणाच्या कालच्या तीन वर्ष पूर्ती सभेच्या निमित्ताने देशाच्या कानाकोपऱ्यातून पेंशनधारकांची उपस्थिती लाभली.
न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार
या सभेत साखळी उपोषणात सातत्याने सहभागी होणाऱ्या पेंशनधारकांचा सत्कार राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या हस्ते करण्यात आला. प्रमुख भाषणात कमांडर राऊत म्हणाले की, आपला लढा हा अंतिम टप्प्यात असून, जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत बुलडाणा येथील आंदोलन सुरूच ठेवण्यात येणार आहे. तसेच यावेळी संघटनेचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत, महिला फ्रंट राष्ट्रीय अध्यक्षा शोभा आरस, महाराष्ट्र सचिव सुधीर चाँडगे, मुख्य समन्वयक विलास पाटील, जिल्हा अध्यक्ष रामेश्वर शेडगे, कोषाध्यक्ष बी. बी. चव्हाण इत्यादी उपस्थित होते, अशी माहिती EPS ९५ राष्ट्रीय संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक पश्चिम भारत क्षेत्र, सबॉर्डीनेट इंजिनियर्स असोसिएशन MSEB चे माजी अध्यक्ष चंद्रशेखर देशपांडे यांनी दिली.
( हेही वाचा :महिलांच्या सुरक्षेसाठी ‘निर्भया’ उपक्रमाचं ‘नवं पाऊल’ )
Join Our WhatsApp Community