हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सकाळपासूनच विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडीचा विषय चर्चेला आला. माध्यमांमध्ये सरकार अध्यक्ष पदाच्या निवडीची प्रक्रिया २७, २८ डिसेंबर रोजी करणार अशी चर्चा सुरु होती, त्या आधारे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात विचारणा केली, त्यावर संसदीय मंत्री अनिल परब यांनी असा कोणताही कार्यक्रम नाही, असे स्पष्ट केले. तर दुसरीकडे काँग्रेसचेअध्यक्ष नाना पटोले यांनी अध्यक्ष पदाच्या निवडप्रक्रियेची सुरुवात आजपासूनच सुरु होणार असल्याचे माध्यमांना सांगितले. यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीवरून सरकार कमालीची गुप्तता पळत आहे.
अनिल परब यांच्याविरोधात हक्कभंगाचा इशारा
सकाळपासून माध्यमांसमोर विधानसभा अध्यक्षपदाची निवड २७, २८ डिसेंबर रोजी होणार आहे, अशी चर्चा सुरु होती. यावरून भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विधान सभेत आक्षेप घेतला. संसदीय कामकाज समितीच्या बैठकीत कामकाज ठरलेले नसतानाही माध्यमांसमोर सरकार २७, २८ डिसेंबर रोजी अध्यक्षपदाची निवड करणार आहे, अशी चर्चा सुरु आहे. संसदीय कार्य मंत्री अनिल परब यांनी याविषयाची माहिती आधी सभागृहाला दिली पाहिजे, यावरून त्यांच्याविरोधात हक्कभंग आणण्यात येणार आहे, असे म्हटले.
सरकारने अध्यक्षपदाच्या निवडीच्या आधी १२ निलंबित आमदारांचे निलंबन मागे घ्यावे, तसा अर्ज त्यांनी केला आहे. त्यांचा विचार झाला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाचा तसा आदेश आहे.
– देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
अनिल परबांनी सभागृहात मांडले कामकाज
त्यावेळी संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी असे कुठलेही कामकाज ठरले नाही. मुनगंटीवार हे माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांवरून सभागृहात माहिती देत आहेत, हे चुकीचे आहे. असे सांगत २७, २७ डिसेंबर या दोन दिवसांचे ठरलेले कामकाजच सांगितले. तसेच कोणताही नवीन कार्यक्रम असेल तर तो दिवसाच्या कामकाजात समाविष्ट केला जातो.
(हेही वाचा “…अन्यथा ते अधिवेशनाचा कालावधी वाढवणार नाहीत”)
नाना पटोले म्हणतात, निवडप्रक्रिया सुरु
त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना विधानसभा अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया आजपासूनच सुरु झाली आहे. २७, २८ डिसेंबर रोजी त्यावर अंतिम निर्णय होणार आहे, असे म्हटले. यासाठी भक्कम उमेदवार देण्याचा प्रयत्न असणार आहे, असे पटोले म्हणाले.
थोपटेंचे नाव जवळपास निश्चित
पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला राष्ट्रवादीतून नापसंती आहे. तर अशोक चव्हाण या पदासाठी इच्छूक नसल्याचे सूत्रांकडून समजते. नितीन राऊत यांनाही ऊर्जा खाते सोडायचे नसल्याने अखेर संग्राम थोपटे यांच्या नावावर पक्षातून शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.