भारतीय हद्दीत घुसणाऱ्या दहशतवाद्यांचा आम्ही खात्मा करतो. परंतु, वेळप्रसंगी सीमेपलीकडील दहशतवाद्यांना कंठस्नान घातले जाईल असा गंभीर इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिला. राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज, शुक्रवारी दोंडाईचा येथे विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
”आम्ही जे बोलू ते करून दाखवू”
याप्रसंगी सिंह म्हणाले की, मला आपल्या शेजारी राष्ट्राला विचारायचे आहे की, त्यांना आपल्या देशाला अस्थिर करायचे आहे का? यापूर्वी एअर स्ट्राईक, सर्जिकल स्ट्राईक नव्हते परंतु, आम्ही ते केल्याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली. भारताने आजवर आक्रमण केलेले नाही किंवा कब्जा केलेला नाही. पण, जर एखाद्याने भारताची कुरापत केली तर त्याला सोडणार नाही. आम्ही केवळ भारताच्या हद्दीतच नव्हे तर, सीमेपलिकडेही जाऊन दहशतवाद्यांचा खात्मा करू शकतो असा सज्जड दम त्यांनी यावेळी पाकिस्तानला दिला. सगळे बदलू शकतात पण शेजारी बदलू शकत नाहीत असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. जेव्हापासून देश स्वतंत्र झाला तेव्हापासून फक्त आश्वासने दिली गेली. नेत्यांवरील विश्वास कमी झाला आहे. मात्र आम्ही जे बोलू ते करून दाखवू असे सांगत 2019 च्या जाहीरनाम्यात जे लिहिले होते ते पूर्ण करू, असे सिंह म्हणाले.
(हेही वाचा –धाडसत्र सुरूच! तुकाराम सुपेंकडे आणखी 58 लाखांचं सापडलं घबाड)
वीरांची भूमी म्हणून महाराष्ट्राची ओळख
धुळ्यातील विविध विकासकामांचेउद्धाटन केल्यानंतर सिंह यांनी उपस्थितांशी संवाद साधला विशेष म्हणजे त्यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. मला महाराष्ट्रात आल्यानंतर खूप आनंद होतो, असे सांगत मी उत्तरप्रदेशातून आलो असून उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र यांचा जवळचा संबंध आहे. वीरांची भूमी म्हणून महाराष्ट्राची ओळख असल्याचे त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community