‘त्या’ नवजात शिशुंना जन्मलेल्या ठिकाणी, रुग्णवाहिकांमध्ये जंतूसंसर्ग होण्याची शक्यता

136

भांडुपमधील सावित्रीबाई फुले महापालिका प्रसुतीगृहात झालेल्या चार नवजात शिशुंच्या मृत्यू प्रकरणी चौकशी अहवाल येत्या सात दिवसांमध्ये सादर करण्यात येणार आहे. परंतु या नवजात शिशुंना महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये सावित्रीबाई फुले प्रसुतीगृहातील बालकांच्या अतिदक्षता विभागात दाखल केले होते. त्यामुळे नवजात शिशुंना जन्मलेल्या ठिकाणी व पुढील उपचाराच्या प्रवासादरम्यान या जंतूचा संसर्ग होण्याची शक्यता असते. तसेच या नवजात शिशुंच्या या तपासात अनेक औषधे परिणामकारक ठरली नसल्याचेही आढळून आल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाने प्राथमिक अहवालात म्हटले आहे.

प्राथमिक अहवाल

सावित्रीबाई फुले महापालिका प्रसुतीगृहात २० खाटांचे नवजात शिशु अतिदक्षता विभाग ऑगस्ट २०२१ पासून सुरु करण्यात आले आहे. इंडियन पिडियाट्रीक नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड या खासगी संस्थेची यासाठी नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये १० खाटा या सावित्रीबाई फुले प्रसुतीगृहात जन्मलेल्या बालकांसाठी राखीव असून १० खाटा या इतर प्रसुतीगृहातून दाखल होणाऱ्या शिशुंसाठी राखीव आहे.

याठिकाणी जन्मलेल्या १२ नवजात शिशुंवर उपचार सुरु असून त्यांना जंतूसंसर्ग झाला नसल्याचे आढळून आले आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. तर २० ते २३ डिसेंबरपर्यंत चार शिशुंना जंतसंसर्गामुळे मृत्यूमुखी पडले. त्यात १ मुलगी आणि ३ मुलगे होते. चारही बालकांपैकी २ बालके कमी वजनाची व कमी दिवसांची होती. एक बालक गंभीर स्वरुपाचे दाखल झाले होते. तर त्यातील एका बालकाला फिट्स येवून गुंतागुंत झाल्यामुळे गंभीर होऊन मृत्यू झाला आहे. बालकांच्या अतिदक्षता विभागात दाखल असलेल्या ३ नवजात शिशुंपैकी एकाला जंतूसंसर्ग झालेला नाही. तसेच उर्वरीत दोघांना संसर्ग झाल्याचा अहवाल प्राप्त झाला असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे या अहवालात नमुद करण्यात आले आहे.

( हेही वाचा : प्रवाशांनो लक्ष द्या! रविवारी ‘या’ मार्गावर असणार मेगाब्लॉक )

सखोल चौकशीसाठी विशेष समिती गठीत

या जंतूसंसर्गाचा उगम शोधण्यासाठी सर्व महापालिका प्रसुतीगृह, रुग्णालय, रुग्णवाहिका व एनआयसीयू भांडुप येथील स्वॅब कल्चरल अँड सेन्सिटीवीटी तपासणीसाठी शीव रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तसेच याची सखोल चौकशी करण्याकरता शीव रुग्णालयातील न्यूओनेटॉलॉजी विभाग प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास करून सात दिवसांमध्ये अहवाल सादर केला जाईल, असे नमुद करण्यात आले आहे. अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी आणि कार्यकारी आरोग्य अधिकारी यांच्या स्वाक्षरीने हा प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.