सावरकर स्मारकाची निवडणूक : दीक्षित-टिळक आमनेसामने! प्रवीण दीक्षित बहुमताने विजयी होतील असा सावरकरप्रेमींना विश्वास

153

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदाची निवडणूक २६ डिसेंबर रोजी होणार आहे. त्यासाठी भूतपूर्व पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित हे अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार काँग्रेसचे दीपक टिळक आहेत. अध्यक्षपदी राहून आपल्याला वीर सावरकर यांचे विचार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नव्या पिढीपर्यंत पोहोचवायचे आहेत. दीक्षित यांच्या या भूमिकेमुळेच ते विजयी होतील, असा विश्वास सावरकरनिष्ठांना वाटत आहे.

स्मारकाची वाटचाल अधिक प्रभावी होण्यासाठी प्रयत्नशील राहणार! – प्रवीण दीक्षित

वीर सावरकर यांचे स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतीकार्य, तसेच समाजप्रबोधनाचे महत्कार्य देशभर पोहोचवणारे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक हे मुख्य केंद्र आहे. म्हणूनच स्मारकाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यामध्ये भूतपूर्व पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची उमेदवारी सर्वात चर्चेत आहे. कारण दीक्षित यांची अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यामागील भूमिका प्रभावी ठरत आहे.

स्मारकाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यामागे आपली भूमिका स्पष्ट आहे. वीर सावरकर यांचे विचार नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन पिढीपर्यंत पोहोचवायचे आहेत. जे सावरकरप्रेमी वीर सावरकर यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन संशोधन करत आहेत, वीर सावरकर यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करणारे उपक्रम राबवत आहेत, त्यांना पाठिंबा देणे, त्यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देणे. तसेच वीर सावरकर या आमच्या दैवताचा अवमान करणारी राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रातील कुणीही व्यक्ती असो, त्यांना थोपवणे किंवा न्यायालयीन पातळीवरून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे, ही आपली भूमिका आहे.
– प्रवीण दीक्षित, माजी पोलिस महासंचालक.

(हेही वाचा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदासाठीचे उमेदवार माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित)

निवडणूक लढवण्यामागची भूमिका मांडण्यास दीपक टिळकांचा नकार

दुसरीकडे मात्र दीपक टिळक यांच्या उमेदवारीनंतर त्यांच्यासंबंधीचे नवनवीन वाद समोर येऊ लागले आहेत. लोकमान्य टिळकांचे पणतू असलेले दीपक टिळक हे काँग्रेसचे समर्थक आहेत. वीर सावरकर यांची जाहीररित्या बदनामी करणारे एक काँग्रेसनिष्ठ सावरकर स्मारकाच्या अध्यक्षपदासाठी का उभे राहात आहेत, हाच प्रश्न चर्चिला जात आहे. काँग्रेसच्या ‘शिदोरी’ या नियतकालिकात सातत्याने वीर सावरकर यांच्याविरोधात अपमानजनक वक्तव्ये करण्यात आली आहेत. राहुल गांधी यांनीही वारंवार वीर सावरकर यांचा अपमान केलेला आहे. अशा सावरकरविरोधी काँग्रेसच्या समर्थकाला आत्ताच स्मारकाचा पुळका का आला?, असाही प्रश्न सावरकरप्रेमींकडून विचारला जात आहे. विशेष म्हणजे ज्या दीपक टिळक यांनी त्यांच्या उमेदवारीची घोषणा वृत्तपत्रांना प्रसिद्धीपत्रक पाठवून केली, त्या टिळकांनी स्मारकाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यामागील भूमिका माध्यमांसमोर मांडण्यास मात्र नकार दिला.

स्मारकाच्या अध्यक्षपदाची निवडणूक का लढवत आहे, यावर मी प्रसार माध्यमांशी बोलणार नाही. त्याची मला आवश्यकता वाटत नाही. मी फक्त वर्षभरासाठी स्मारकात येत आहे.
– दीपक टिळक, ‘केसरी’ चे संपादक

यंदाच्या स्मारकाच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार, कर्तव्यनिष्ठ माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित कि काँग्रेसनिष्ठ दीपक टिळक?

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.