कुर्ला-कलिनातील मिठी नदीवरील पुलाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेऊन ३६ ते ३८ महिन्यांचा कालावधी लोटला आहे. प्रत्यक्षात हे काम १९ महिन्यांमध्ये पूर्ण होणे म्हणजे कोविडपूर्वी होणे अपेक्षित होते. परंतु हे काम कंत्राटदाराकडून वेळेत पूर्ण करून घेता आले नाहीच, उलट हे काम उशिरा करणाऱ्या या कंत्राटदाराला प्रशासनाने ९.६६ कोटी रुपयांचे बोनस काम बहाल केले. हे काम देताना मिठी नदीवरील पुलासह नवीन मारवाह मार्गावरील पूलाच्या बांधकामाची मुदतही ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वाढवून दिली आहे. त्यामुळे प्रशासन कंत्राटदाराला कशाप्रकारे मदत करत त्यांचे हित जपत आहे, याचे उदाहरणच समोर आले आहे.
या कामांसाठी १४ कोटी २२ लाखांच्या खर्चास मान्यता
कुर्ला एल विभागात कुर्ला-कलिना रस्त्यावर मिठी नदीवरील अस्तित्वात असलेल्या पुलाच्या रुंदीकरण कामाचे कंत्राट स्थायी समितीच्या ७ एप्रिल २०१८ च्या मंजुरीने देण्यात आले. या पुलाच्या कामांसाठी १४ कोटी २२ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली होती. हे काम पावसाळा वगळून १९ महिन्यांच्या कालावधीमध्ये होणे अपेक्षित होते. त्यामुळे नियमानुसार हे काम मे २०२१ पर्यंत पूर्ण होणे आवश्यक होते. परंतु डिसेंबर २०२१ उलटत आले तरी हे काम पूर्ण झालेले नाही. १९ महिन्यांचा कालावधी संपुष्टात येत असल्याने या कंपनीला आधी ३१ मे २०२१ पर्यंत मुदत वाढवून देण्यात आली. परंतु त्यानंतर हा कालावधी पुन्हा १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत वाढवून देण्यात आला आहे.
(हेही वाचा – मुंबईतील एकाही रुग्णालयाचे खासगीकरण नको!)
…तरीही या कंत्राटदाराला पुनर्बांधणीचे अतिरिक्त काम
मात्र, हे काम अर्धवट असताना प्रशासनाने कोणत्याही प्रकारची निविदा न काढता संबंधित कंत्राटदारालाच ९.६६ कोटींचे काम बहाल केले आहे. कुर्ल्यातील कृष्णलाल मारवाह मार्गावरील पिकनिक हॉटेलजवळ ७ मीटर रुंदीचा मारवाह नावाचा पूल अस्तित्वात आहे. या पुलाची दक्षिणेकडील भिंत ११ जून २०२१ रोजी कोसळल्यामुळे व पुलाच्या स्लॅबला तडे गेल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे. हा पूल साकीविहार रस्ता व मरोळ मरोशी रोडवरील सेव्हन हिल्स कोविड हॉस्पिटलला जाण्याकरताचा मुख्य मार्ग आहे. हा पूल वाहतुकीसाठी बंद असल्याने सेव्हन हिल्स कोविड रुग्णालयाला जाण्याकरता अंधेरी कुर्ला घाटकोपर मार्गावर जाण्यासाठी ४ ते ५ कि. मी वळून जावे लागले. त्यामुळे या पुलाचे काम त्वरीत करण्यासाठी कुर्ला-कलिना मिठी नदी पुलाचे काम करणारे कंत्राटदार ए. आर. कंस्ट्रक्शन यांना मारवाह पुलाच्या पुनर्बांधणीचे अतिरिक्त काम देण्यात आले आहे. हे काम प्रशासन निविदा काढून देऊनही शकले असते. परंतु प्रशासनाने यासाठी निविदा न काढता अत्यंत धिम्या गतीने काम करणाऱ्या कंत्राटदारालाच काम देण्याचा निर्णय घेतला आहे.
Join Our WhatsApp Community