मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद प्रयत्नशील आहे. यासाठी युवा साहित्य संमेलनाच्या माध्यमातून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना 75000 पत्रे पाठविण्यात येणार आहेत. त्याचा शुभारंभ आज नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
मराठीला अभिजात दर्जा मिळू नये, ही खेदाची गोष्ट
मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी 2004 साली केंद्र शासनाच्या वतीने एक उपक्रम राबविण्यात आला. त्या अंतर्गत केंद्र सरकारने एक समिती नेमली. या समितीने मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून 550 पानांचा अहवाल केंद्र सरकारला सादर केला होता, मात्र अद्याप त्यावर कोणतीही समाधानकारक अंमलबजावणी झालेली नाही. यासाठीच कोकण मराठी साहित्य परिषद राष्ट्रपतींना 75,000 पोस्टकार्ड पाठवून त्याचे स्मरण करून देणार आहे. राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की, अनेक शतकांची परंपरा लाभलेल्या मराठी भाषेचा प्रतिनिधी म्हणून मी आपल्याशी संवाद साधत आहे. मराठी भाषेने भारताच्या सांस्कृतिक-साहित्यिक इतिहासात फार मोलाचे योगदान दिले आहे. संत ज्ञानेश्वरांपासून आजच्या साहित्यिकांपर्यंत अनेकांनी तिला समृद्ध केले आहे. अशा मराठीला अजूनही अभिजात भाषेचा दर्जा मिळू नये, ही खेदाची गोष्ट आहे. आपण या विषयात लक्ष घालावे आणि सात दशके प्रलंबित राहिलेला हा प्रश्न मार्गी लावावा. यासाठी मी आपल्याला राज्यस्तरीय युवा शक्ती मराठी साहित्य परिषदेच्या व्यासपाठीवरून कळकळीची विनंती करीत आहे.
(हेही वाचा – राज्यात नाईट कर्फ्यू जाहीर झाल्यानंतर केंद्राने घेतला मोठा निर्णय, वाचा…)
कोकण मराठी साहित्य परिषद सदैव प्रयत्नशील
कोमसापचे राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन 11-12 जानेवारी, 2022 रोजी ठाण्यात संपन्न होणार आहे. युवा साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ही सह्यांची मोहिम हाती घेण्यात आली आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद सदैव प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून या संमेलनात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी करणारी महाविद्यालयीन-शालेय विद्यार्थी आणि अन्य मान्यवरांच्या स्वाक्षरीसह तब्बल ७५ हजार पत्रे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठविण्यात येणार आहेत. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे प्रमुख नेते आणि मंत्री असल्याने त्यांच्या हस्ते हा शुभारंभ करण्यात आल्याची माहिती कोमसापचे कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ यांनी दिली.
Join Our WhatsApp Community