सावरकरनिष्ठ विजयी! सावरकर स्मारकाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रवीण दीक्षित यांचा दणदणीत विजय 

269

मागील काही दिवसांपासून स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदाची निवडणूक मोठ्या प्रमाणात चर्चेला आली. यंदाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांचा १३७ विरुद्ध २ या फरकाने दणदणीत विजय झाला. या निवडणुकीत दीक्षित यांच्या विरोधात उभे राहिलेले ‘केसरी’चे संपादक दीपक टिळक यांचा दारूण पराभव झाला.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदाची निवडणूक मोठ्या उत्साहात झाली. २६ डिसेंबर रोजी, रविवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत स्मारकाच्या वास्तूत मतदान झाले. यावेळी कोरोना नियमांचे काटेकारपणे पालन करण्यात आले होते. दिवसअखेर मतमोजणी झाली, तेव्हा प्रवीण दीक्षित यांना १३७ मते मिळाली, तर दीपक टिळक यांना केवळ २ मते मिळाली. निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून शिवराज्याभिषेक दिनोत्सव समितीचे अध्यक्ष सुनील पवार तर त्यांचे सहाय्यक म्हणून किरण शिंदे आणि राजेंद्र देसाई यांनी काम पाहिले.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या समस्त सावरकरप्रेमींनी माझी स्मारकाच्या अध्यक्षपदी निवड केली. त्याबद्दल मी सर्व सदस्यांचा आभारी आहे. माझी सर्वांना विनंती आहे की, स्मारकाच्या कार्यासंबंधी काही सूचना असतील, तर त्या सावरकरप्रेमींनी जरूर कळवाव्यात. त्यांचे स्वागत आहे.
– प्रवीण दीक्षित, नवनिर्वाचित अध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक.

प्रवीण दीक्षितांची भूमिका ठरली प्रभावी

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभे राहिल्यावर प्रवीण दीक्षित यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. वीर सावरकर यांचे विचार नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन पिढीपर्यंत पोहोचवणे, जे सावरकरप्रेमी वीर सावरकर यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन संशोधन करत आहेत, वीर सावरकर यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करणारे उपक्रम राबवत आहेत, त्यांना पाठिंबा देणे, त्यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देणे. तसेच वीर सावरकर या आमच्या दैवताचा अवमान करणारी राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रातील कुणीही व्यक्ती असो, त्यांना थोपवणे किंवा न्यायालयीन पातळीवरून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे, ही प्रवीण दीक्षित यांची अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यामागची भूमिका समस्त सावरकरप्रेमींना प्रभावशाली वाटली. ज्यामुळे दीक्षित यांच्या गळ्यात स्मारकाच्या अध्यक्षपदाची माळ पडली. प्रवीण दीक्षित हे १९७७ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवेतील निवृत्त अधिकारी आहेत. ३९ वर्षे त्यांनी पोलिस अधिकारी म्हणून कर्तव्य बजावले. या दरम्यान ते महाराष्ट्र पोलिस, राज्य राखीव दलाचे प्रमुख होते.

काँग्रेसनिष्ठेचा दारूण पराभव 

या निवडणुकीची घोषणा होताच, प्रवीण दीक्षित यांच्या विरोधात काँग्रेसचे निष्ठावान, राहुल गांधींचे समर्थक ‘केसरी’चे संपादक दीपक टिळक उभे राहिले होते. दीपक टिळक यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्मारकावरच खोटेनाटे आरोप करत बदनामीचे सत्र वृत्तपत्रांमधून चालवले होते. मतमोजणीच्या वेळी दीपक टिळकांना अवघी २ मते मिळाल्याचे समजताच टिळकांनी स्मारकावर केलेले आरोप हे बिनबुडाचे होते, हे समस्त सावरकरप्रेमींनी दाखवून दिले, हे स्पष्ट झाले. दीर्घकाळ स्मारकाच्या संपर्कात न राहिलेले दीपक टिळक हे अचानक स्मारकाच्या कार्यकारिणीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणार होते, त्यांच्या दुषित हेतूमुळे अखेर त्यांचा दारूण पराभव झाला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.