कुर्ला येथील महापालिकेच्या ताब्यात आलेल्या मैदानाच्या जागेवर त्वरीत विकास करण्यात यावा आणि या विकासांतर्गत उपलब्ध जागेवर बहुमजली सुसज्ज असे क्रीडा संकुल बांधण्यात यावे, अशी मागणी सुधार समिती अध्यक्ष सदानंद (सदा) परब यांनी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कुर्ला पश्चिम येथील शासकीय भूखंडावरील अनधिकृत बांधकामे हटवली जावी यासाठी स्थानिक ज्येष्ठ नागरिकांनी उच्च न्यायालयात १६ वर्षे लढा दिला. यात त्यांना यश आले असून त्यानंतर येथील बांधकामे २०१६ मध्ये काढून टाकण्यात आली. अतिक्रमणे हटवल्यानंतर एकमेव झोपडे होते. त्यांनाही पर्यायी घर देण्याचे एल विभागाच्या सहायक आयुक्तांनी मान्य केले. पण सर्व प्रकारच्या अर्ज व विनंती करूनही काहीच निष्पन्न होत नसल्याने २१ डिसेंबर २०२१ रोजी कुर्ला येथील ज्येष्ठ नागरिकांनी प्राणांतिक आंदोलन सुरु केले. त्यानंतर याची दखल शासन व महापालिका दरबारी घेण्यात आली आणि त्यांनी हे अतिक्रमण तोडून हा भूखंड महापालिकेच्या ताब्यात घेण्यात आला.
ज्येष्ठ नागरीकांचा लढा यशस्वी
कुर्ल्यातील ज्येष्ठ नागरीकांनी हे मैदान खेळाडूंना तथा तरुणांना खेळण्यासाठी उपलब्ध व्हावे म्हणून अनेक वर्षे लढा दिला आहे. त्यामुळे या जागेवर सुसज्य क्रीडा संकुल बांधण्यात यावे. अशी येथील नागरीकांची इच्छा असल्याचे नमुद करत सुधार समिती अध्यक्ष सदा परब यांनी याप्रमाणेच मैदानाचा विकास करण्यात यावा,असे आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. या क्रीडा संकुलात कुस्ती, कॅरम, टेबल टेनिस, व्हॉली बॉल, शुटींग बॉल, कबड्डी, खो-खो, इत्यादी आणि सर्व सोयीयुक्त एक प्रशस्त सभागृह अर्थात हॉल बनवण्यात यावा.
( हेही वाचा : ३ जानेवारीपासून १५ वर्षांवरील मुलांचे लसीकरण! पंतप्रधानांच्या ‘त्या’ घोषणा कोणत्या? )
क्रीडा संकुल बांधा
कुर्ल्यात असंख्य क्रीडा मंडळ, व्यायामशाळा, सामाजिक संस्था आहेत. परंतू, खेळण्यासाठी मैदान नसल्याने खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळत नाही. म्हणून उपलब्ध झालेल्या जागेवर बहुमजली सुसज्ज क्रीडा संकुल बांधण्यात यावे, याबाबतचे आदेश संबंधित विभागांना तातडीने देण्यात यावेत जेणे करुन कुर्लावासीयांनी लढयातून मिळवलेल्या मैदानाचा लवकरात लवकर लाभ घेता येईल,असे या पत्रात म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community