तेलंगणात 6 नक्षलवाद्यांना कंठस्नान! घटनास्थळी शोधमोहीम सुरू

96

तेलंगणा आणि छ्त्तीसगड सीमा भागातील भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यातील पेसलपाडू जंगल परिसरात आज, सोमवारी सकाळी 6.30 वाजता सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 6 नक्षलवादी ठार झाले. चकमकीच्या ठिकाणावरून ६ नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि अनेक शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. तेलंगणच्या कोट्टागुडम एसपी सुनील दत्त यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. घटनास्थळी शोधमोहीम सुरू आहे.

6 नक्षलवादी ठार

यासंदर्भात भद्राद्री कोठागुडेमचे पोलिस अधीक्षक सुनील दत्त यांनी सांगितले की, तेलंगणा ग्रेहाऊंड्स आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. तेलंगणा आणि छत्तीसगडच्या सीमावर्ती भागातील किस्ताराम पीएस सीमेवरील जंगल परिसरात झालेल्या चकमकीत 6 नक्षलवादी ठार झाले असून आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले.

( हेही वाचा : ‘ठाकरे सरकार’चं ‘वांद्रे वंडरलॅंड’ करतंय लोकांच्या जीवाशी खेळ! )

नक्षलवाद्यांवर कारवाई

नक्षलवाद्यांकडून सुरक्षा दलावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. तेलंगणाच्या ग्रेहाऊंड सैन्याने ही आंतरराज्य संयुक्त कारवाई केली. छत्तीसगडच्या डीआरजी आणि सीआरपीएफ दलांनी मदत पुरवली. पोलिसांनी सांगितले की नक्षलवादी चेरला एरिया कमिटीचे होते आणि मृतांमध्ये एका वरिष्ठ नेत्याचाही समावेश आहे. त्यांची ओळख पटणे अद्याप बाकी आहे. अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांकडून पोलिसांनी एक रायफल, जिवंत काडतुसं आणि इतर दारूगोळा जप्त केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.