निवडणुकीच्या गोदामासाठी मुलुंड जकात नाक्याची जागा

115

मुलुंड जकात नाक्याच्या जागेवर टान्सपोर्ट हब तयार करण्याचा विचार सुरु असतानाच आता या जागेवर आगामी महापालिका निवडणुकीकरता निवडणूक गोदाम बनवले जाणार आहे. त्यामुळे या जकात नाक्याच्या जागेवर संरक्षण भिंत उभारण्याचे काम हाती घेण्यात येत आहे. या संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठी महापालिकेच्यावतीने पाऊल उचलण्यात आले आहे.

मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक फेब्रुवारी २०२२ ला प्रस्तावित असली तरी ओबीसी आरक्षण आणि वाढीव प्रभागांच्या मुद्दयावरून न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणावरून प्रत्यक्षात ही निवडणूक कधी होईल, हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करनिर्धारण, संकलन विभाग व निवडणूक विभागाच्यावतीने निवडणूक गोदाम बनवण्याचे काम हाती घेण्यात येत आहे. या कामांमध्ये संरक्षक भिंतीचे बांधकाम व प्रवेशद्वार, नवीन खिडक्या, खिडक्यांना ग्रील, रंगकाम आणि विद्युत कामांचा समावेश आहे.

( हेही वाचा : कोंडिविटांत उभारणार नवीन जलतरण तलाव )

निवडणुकीच्या कामांचे नियोजन करण्यासाठी गोदाम

या कामांसाठी मागवण्यात आलेल्या निविदांमध्ये हरिष प्रोजेक्ट कॉन्ट्रक्टर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पात्र ठरली. अंदाजित खर्चापेक्षा ३३ टक्के कमी बोली लावत हे काम ८८ लाख ४२ हजार रुपयांमध्ये करण्यात येणार आहे. यापूर्वी ही जागा मेट्रो रेल्वेच्या कामांसाठी कंत्राटदाराला वापरण्यास देण्यात आली होती. तसेच या जागेवर  रुग्णालय बनवण्याची मागणी शिवसेना नगरसेविका समृध्दी काते यांनी केली होती. परंतु याठिकाणी रुग्णालय बनवणे योग्य नसून त्याठिकाणी पार्किंग ट्रान्सपोर्ट हब उभारण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले होते. जकात नाक्यांची जमीन ही वाणिज्यिक पट्टयातील आहे. विकासाकरता केंद्रीय व्यवसाय जिल्हा (सीबीडी)  तथा पार्किंग ट्रान्सपोर्ट हब आंतर शहर स्थानकासह मानण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. याचा विकास नियमावलीतंर्गत करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले होते. निवडणुकीच्या कामांचे नियोजन करण्यासाठी गोदाम बनवण्यात येत असले तरी भविष्यात या जागेवर पार्किंग ट्रान्सपोर्ट हब बनवण्याची शक्यता अधिक आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.