राज्याच्या विधानसभा निवड प्रक्रियेमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यपालांना महाविकास आघाडीने पाठवलेल्या मंजुरी प्रस्तावावर अद्याप राज्यपाल कोश्यारी यांनी निर्णय घेतलेला नाही तर दुसरीकडे राज्य सरकार मात्र अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेण्यावर ठाम आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि राज्यपालांमध्ये संघर्ष वाढताना दिसतोय. आवाजी मतदानाने निवडणूक घेणं हे घटनाबाह्य आहे, असं राज्यपालांनी राज्य सरकारला सांगितलं. या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी त्यांची रोखठोक भूमिका मांडली आहे. यावेळी शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी राज्य सरकारला राज्यपालांशीच दोन हात करण्याचा सल्ला दिला आहे.
काय म्हणाले भास्कर जाधव…
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. आज तरी विधानसभा अध्यक्षपदाची निवड होणार का? याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राज्यपाल संविधानाप्रमाणे वागत नसतील तर महाराष्ट्र सरकारने दोन हात करण्याची हिंमत दाखवावी, असे मत भास्कर जाधव यांनी व्यक्त केले. ते पुढे असेही म्हणाले की, कधीतरी हा सामना सरकारला करावाच लागेल. राज्यपाल हे केंद्र सरकार किंवा राज्य सरकारचे नोकर नाहीत. भारतीय राज्यघटनेच्या कलम १७८ नुसार राज्यपालांनी संवैधानिक शपथ घेतलेली असते. संवैधानिक कायद्याचे मी पालन करेन ही शपथ त्यांनी घेतलेली असते. त्यामुळे भारतीय संविधान जे सांगते, त्यानुसार राज्यपाल वागत नसतील, तर राज्य सरकारने दोन दोन हात करण्याची हिंमत दाखवावी, असे माझे वैयक्तिक मत आहे.
(हेही वाचा – Video: वर्धापन दिनी गालबोट! काँग्रेस झेंडा फडकण्याऐवजी पडला सोनियांच्या हातात…)
तेव्हा तुमचा राधा सुधा धर्म कुठे गेला होता
५ जुलैला मी भाजपच्या १२ आमदारांना निलंबित केले होते. त्यावेळी भाजपच्या नितेश राणेंनी जे वक्तव्य केले होते. नितेश राणे यांनी, भास्कर जाधव यांना बिस्कीट देऊन बारा आमदारांचे निलंबन करायला लावले असल्याचे म्हटले होते. सभागृहातले एक सदस्य सातत्याने कुणावरतरी टीका करतायत, असंसदीय भाषा वापरत आहेत. त्यांच्याच पक्षाने नितेश राणेंना समज दिली होती. पण त्याचवेळी त्यांनी ट्वीटरवर आणि माध्यमांमध्ये सांगितलं की मी एकदा नाही, हजारवेळा असे बोलेन. काळ का सोकावला? साधा प्रश्न होता, अंगविक्षेप केला की माफी मागायला लावता. मात्र, तुमचे सदस्य असे वागतात तेव्हा तुमचा राधा सुधा धर्म कुठे गेला होता, असा सवाल भास्कर जाधव यांनी केला.