जैवविविधता समिती अंतर्गत मुंबईत पक्षांची संख्या वाढविण्यासाठी नेचर फॉरेव्हर सोसायटी यांच्या सोबत मुंबईतील ५० उद्यानांमध्ये ‘कन्झर्व्हेशन ऑफ बर्ड्स’ (‘CONSERVATION OF BIRDS’) हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईत वाढत्या सिमेंटच्या जंगलामुळे दुर्मिळ झालेल्या पक्ष्यांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे आणि पुन्हा एकदा मुंबईत पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला मिळणार आहे.
‘पक्षी संवर्धन’ या विषयी सादरीकरण केले
मुंबईतील भायखळा येथील राणीबाग सभागृहात जैविक विविधता व्यवस्थापन समितीची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये अशा प्रकारचा उपक्रम राबवण्याच्या मुद्यावर चर्चा करण्यात आली आहे. या बैठकीला महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह उद्यान व बाजार समितीचे अध्यक्षा प्रतिमा खोपडे, नगरसेविका आशा मराठे, नगरसेविका रुक्साना सिद्दिकी, नगरसेविका ऋतुजा तारी, समितीचे मान्यवर सदस्य, रा.ए.स्मा. (केईएम) अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख, समितीचे सदस्य सचिव तथा उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी, समितीचे समन्वयक ज्ञानदेव मुंढे आदी मान्यवर उपस्थित होते. या संपन्न झालेल्या समितीच्या दुस-या सभेमध्ये मोहम्मद दिलावर यांनी ‘पक्षी संवर्धन’ या विषयी सादरीकरण केले. तसेच जैविक विविधतेच्या संवर्धनासाठी महापालिकेने पूर्ण केलेले व हाती घेतलेल्या उपक्रमांची माहिती देखील आजच्या बैठकी दरम्यान संगणकीय सादरीकरणाद्वारे देण्यात आली.
३ लाख वृक्ष लागवड करण्यात आल्याचा दावा
वेळोवेळी निसर्ग वाचविण्यासाठी राबविण्यात येणाऱया उपक्रमांतर्गत ‘ग्रीन सॅन्टा’/ (‘GREEN SANTA’) हा अभिनव उपक्रम मे. गोदरेज लिमिडेट यांच्यामार्फत मुंबईत राबविण्यात आला. कमीत कमी जागेत जास्तीत जास्त वृक्षारोपण करुन कमीत कमी वेळेत शहरी वने तयार करण्याचा हेतु साध्य करण्याकरिता मुंबई महानगरपालिकेने मियावाकी पध्दतीने वनीकरण करण्याचा प्रकल्प हाती घेतला. या प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्रीआदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पांतर्गत सुमारे ३ लाख वृक्ष लागवड करण्यात आल्याचा दावा उद्यान विभागाने केला आहे. या उपक्रमाला कॉन्सुलेट जनरल, जपान (जपानचे वाणिज्य दुतावास) यांच्या मार्फत प्रशस्तीपत्र प्राप्त झाले आहे.
Join Our WhatsApp Community