मुंबई महापालिकेने निवडणुकीच्या प्रभाग रचनेबाबत पाठवलेला प्रारुप आराखडा राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिकेकडे परत पाठवण्यात आला आहे. त्यामुळे राज्य निवडणूक विभागाच्या माध्यमातून अधोरेखित केलेल्या मुद्याबाबत सुधारणा करून पुन्हा राज्य निवडणूक आयोगाला हा आराखडा सादर करण्याच्या दृष्टीकोनातून महापालिका निवडणूक विभाग कामाला लागले आहे.
आराखड्यात त्रुटी आढळल्या
मुंबई महापालिकेची २०२२ची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारीला होण्याची शक्यता लक्षात घेता महापालिका निवडणूक विभागाने प्रभाग रचनेतील त्रुटीमध्ये सुधारणा करून याचा प्रारुप आराखडा राज्य निवडणूक विभागाला सादर केला होता. परंतु यामध्ये काही त्रुटी असल्याने राज्य निवडणूक विभागाने मागील आठवड्यात महापालिका निवडणूक विभागाला परत पाठवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार महापालिकेच्या निवडणूक विभागाने २२७ प्रभागांचा रचनेचा कच्चा आराखडा राज्य निवडणूक आयोगाला सादर केला होता. परंतु राज्याच्या कॅबिनेट बैठकीत २२७ प्रभागांमध्ये ९ वाढवून त्यांची संख्या २३६ प्रभाग एवढी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या वाढीव प्रभागांच्या रचेनेबाबत सुधारणा करून त्यानुसार प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा सादर करण्यात यावा, अशी सूचना केली आहे. त्यानुसार सुधारीत कच्चा आराखडा पुन्हा राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
Join Our WhatsApp Community