भारतीय संस्कृतीनुसार गुढीपाडव्याला नववर्षारंभ साजरा करा!

भारतात वाढत चाललेला पाश्चिमात्त्यांच्या संस्कृतीचा प्रभाव

131

‘भारत देश जसा आधुनिकीकरणाकडे वाटचाल करत आहे, तसतसा भारतियांवर पाश्चिमात्त्यांच्या संस्कृतीचा प्रभाव वाढत चालला आहे. पूर्वी शाळा-महाविद्यालयांमध्ये हळदी-कुंकू समारंभ साजरे व्हायचे. समाज आणि राष्ट्र यांसाठी आपले जीवन वाहून घेतलेले समाजसुधारक, क्रांतीकारक यांच्या जयंती, पुण्यतिथी साजऱ्या होत होत्या परंतु; सध्या ‘व्हॅलेंटाईन डे’, ‘रोज डे’, ‘रीबीन डे’, ‘साडी डे’, ‘फ्रेंडशीप डे’ साजरे होताना सर्वत्र दिसत आहे. महाविद्यालयीन विद्यार्थीनी ‘जीन्स’, ‘टी-शर्ट’ यांसारख्या वेशांत महाविद्यालयांत विद्येचे धडे घेतांना दिसतात. पूर्वी चित्रपटांतही क्वचितच दिसणार्या ‘मिडी-मिनी’ वेषातील मुली आज प्रत्येक महाविद्यालयाच्या आवारात वावरतांना दिसतात.

…म्हणून भारतीयांची हिंदू संस्कृती हरवतेय

पाश्चिमात्त्यांच्या संस्कृतीच्या आचरणामुळे आजच्या युवापिढीचा ऱ्हास होत चालला आहे. या आचरणामुळे आपली मूळ हिंदू संस्कृती हरवत चालली आहे. एक मनोरंजन म्हणून किंवा हौस, मजा म्हणून आपण ३१ डिसेंबर या रात्री येणाऱ्या नवीन वर्षारंभाच्या स्वागतासाठी सज्ज राहतो आणि मध्यरात्री जल्लोशात स्वागत करतो; परंतु असे करणे हे आपल्या संस्कृतीमध्ये नाही. भारतीय संस्कृती प्रमाणे नवीन वर्ष हे चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा या दिवशी असते. या दिवशीच नवीन वर्ष म्हणून साजरा करून आनंद घ्यावा.

भारतीय संस्कृतीचे महत्त्व

भारतीय संस्कृती ही सर्वांत प्राचीन आणि महान संस्कृती आहे. प्राणिमात्राच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत त्याचे आचरण कसे असावे ? आणि आपल्या जन्माचे सार्थक कसे करावे ? हे आपल्या ऋषीमुनींनी वेद उपनिषदांमध्ये लिहून ठेवले आहे. त्याचे पालन करून आज कित्येकांनी आपल्या आयुष्याचे ध्येय साध्य केले आहे. भारतीय संस्कृतीचे आकर्षण आज पाश्चिमात्त्यांनाही आहे. भोगवादी संस्कृतीने ग्रासल्यामुळे ते भारतीय धर्मग्रंथांत चिरंतन सुखाचा शोध घेत आहेत. साधना करून स्वतःचे कल्याण करून घेत आहेत.

1 जानेवारी हा ख्रिस्ती नववर्षाचा आरंभ

1 जानेवारी खरेतर ख्रिस्ती नववर्षाचा आरंभ आहे. आजमितीला जगभरात ख्रिस्ती राष्ट्रे बहुसंख्य असल्याने आणि या राष्ट्रांनी जगातील बहुसंख्य देशांवर आपले अधिपत्य गाजवल्याने तेथील संस्कृतीचा पगडा जगभर पहायला मिळतो. त्यामुळे ‘1 जानेवारी हे जागतिक नववर्ष आहे’, असा अपसमज निर्माण झाला आहे; परंतु जगाच्या आराखड्यावर (नकाशावर) आज अशी अनेक राष्ट्रे आहेत, जी या पाश्चात्त्य संस्कृतीला झुगारून स्वराष्ट्राची संस्कृती जतन करून आहेत. त्यांचे नववर्ष 1 जानेवारीला चालू होत नाही. भारतीय संस्कृती तर या सर्वांहून प्राचीन संस्कृती आहे. भारतीय संस्कृतीनुसार नववर्षाचा आरंभ गुढीपाडव्याच्या दिवशी होतो. पृथ्वीच्या निर्मितीचा दिवसही हाच आहे. त्यामुळे समस्त भारतियांनी नववर्षाचा आरंभ गुढीपाडव्यापासून करायला हवा; परंतु देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही काही गोष्टीत आपण इंग्रजांच्या पारतंत्र्याचा त्याग केलेला नाही. त्यातील हा एक प्रकार आहे.याचा आपण त्याग केला पाहिजे.

भारतीय संस्कृती नष्ट होणार नाही यासाठी प्रयत्न आवश्यक!

हिंदू धर्म / संस्कृती अनादी असल्यामुळे त्याचा प्रत्येक गोष्टीत अनादी ईश्वराच्या विविध रूपांशी संबंध असतो, उदा. विश्वात श्री गणेशतत्त्व जास्त प्रमाणात असते, तेव्हा ज्ञानदायी आणि विघ्नहर्ता श्री गणेशचतुर्थी; शक्तीतत्त्व जास्त प्रमाणात असते, तेव्हा नवरात्र; ज्ञान, भक्ती आणि वैराग्यदायी शिवतत्त्व जास्त प्रमाणात असते, तेव्हा शिवरात्र असते. याउलट इतर पंथियांतील महत्त्वाचे दिवस पृथ्वीवर होऊन गेलेल्या घटनांशी संबंधित आहेत.

पुढील काही उदाहरणांवरून हिंदू धर्माची महानता आणि भारतियांची ‘इंग्रजांची मानसिक गुलामगिरी’ लक्षात येईल.

1. भारतीय संस्कृतीवर आधारित ‘शालिवाहन शक’ इत्यादी शक वर्षगणनेसाठी न मानता इंग्रजांची मानसिक गुलामगिरी म्हणून काळाशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसलेले ‘इ.स.’ ही पद्धत वर्षगणनेसाठी पाळायला आरंभ केला.

2. पाडव्याला निर्मितीशी संबंधित प्रजापतिलहरी पृथ्वीवर सर्वांत जास्त प्रमाणात येत असतांना तो वर्षारंभाचा दिवस म्हणून न पाळता इंग्रजांची मानसिक गुलामगिरी म्हणून 1 जानेवारी हा कोणत्याही तत्त्वावर आधारित नसलेला दिवस वर्षारंभाचा दिवस म्हणून पाळायला आरंभ केला.

3. धनत्रयोदशी हा दिवस आरोग्याची देवता ‘धन्वंतरी’ हिचा दिवस म्हणून पाळण्याऐवजी पाश्चात्त्यांचा ‘जागतिक आरोग्यदिन’ साजरा करण्याची प्रथा रूढ झाली आणि त्या प्रमाणे आचरण होताना दिसते आहे.

4. श्री लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्री लक्ष्मीलहरी पृथ्वीवर सर्वांत जास्त प्रमाणात येत असतांना तो आर्थिक वर्षाच्या आरंभीचा दिवस म्हणून न पाळता इंग्रजांनी चालू करून दिलेला 1 एप्रिल हा कोणत्याही तत्त्वावर आधारित नसलेला दिवस आर्थिक वर्षाच्या आरंभीचा दिवस म्हणून पाळण्यास प्रारंभ केला.

अशा अनेक उदाहरणांवरून पाश्चिमात्य संस्कृतीला कोणताही आधार नसल्याचे लक्षात येते. केवळ त्यांच्याप्रमाणे कृती करणे यापेक्षा भारतीय संस्कृतीचा अंगीकार करून त्याप्रमाणे आचरण करणे अधिक संयुक्तिक आहे. यासाठी भारतीय संस्कृतीप्रमाणे गुढीपाडव्यालाच नवीन वर्ष साजरे करा !

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.