मुंबई महापालिकेत येणाऱ्या कोणत्याही मंत्र्यांना महापौर दालनात येऊन आणि आयुक्तांना तिथे बोलावून चर्चा तथा आढावा घेणे हा नियम आहे. परंतु कोविडचा वाढत्या रुग्ण संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यास आलेल्या पर्यावरण मंत्री व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी थेट महापालिका आयुक्त यांचे कार्यालय गाठले. एवढेच नाही तर खुद्द महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिष्टाचार बाजूला ठेवत तिथे हजेरी लावली. एका बाजूला आयुक्त गटनेत्यांच्या सभेला येत नाही म्हणून कांगावा करणाऱ्या महापौरांनी खुद्द आयुक्तांच्या दालनात हजेरी लावत राजशिष्टाचाराची ऐशी-तैशी करून टाकली. पण राज्याचे राजशिष्टाचार मंत्री यांनाही हा शिष्टाचार पाळता न आल्याने सत्ताधारी पक्षच आता आयुक्तांच्या दावणीला कशाप्रकारे बांधला गेला हेही दिसून आले आहे.
आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या दालनात भेट
ओमायक्रॉन या कोविड विषाणूच्या प्रसारासह एकूणच कोविड बाधित रुग्णांची संख्या वाढीस लागत असल्याने या पार्श्वभूमीवर राज्याचे पर्यटन, पर्यावरण मंत्री व मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात बुधवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आलेल्या आदित्य ठाकरे यांनी महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या दालनात भेट घेत काही मुद्द्यांवर चर्चा केली. याप्रसंगी महापौर किशोरी पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी आदी उपस्थित होते.
प्रथा-परंपरा मोडल्या
महापालिकेच्या आजवरच्या इतिहासात आणि प्रथा परंपरेनुसार महापौरपदावरील व्यक्ती या आयुक्तांच्या दालनात जात नाही. तर कोणतेही अतिथी किंवा मंत्री हे जर महापालिकेत येणार असतील तर त्यांनी महापौर दालनात यावे आणि आयुक्तांनी त्याठिकाणी यावे असा प्रघात आहे. आज मुंबई महापालिकेत आणि राज्यात शिवसेनेची सत्ता असून आता याच पक्षाकडून प्रथा आणि परंपरा मोडीत काढत राजशिष्टाचाराची ऐशी तैशी केली जात आहे. राजशिष्टाचार मंत्री आणि उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितच महापौरांचा राजशिष्टाचार मोडून महापौरांपेक्षा आयुक्त मोठे असल्याचे दाखवण्याचे काम खुद्द शिवसेनेच्याच नेत्यांकडून झाल्याचे पहायला मिळत आहे. महापालिका आयुक्त हे आपल्या डोक्यावर मुख्यमंत्र्यांनी हात ठेवला आहे, असेच वर्तन करत असून पालकमंत्री आदित्य ठाकरे यांची मर्जी संपादन केल्याने ते महापौरांना आणि महापालिकेतील शिवसेना नेते तसेच गटनेते यांना जुमानत नाहीत. कोविड नंतर महापौरांनी बोलावलेल्या एकाही गटनेत्यांच्या बैठकीला आयुक्त हजर राहिले नाही आणि राहतही नाही. त्यामुळे महापौरांच्या वतीने सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी स्थायी समितीच्या बैठकीत नाराजीही व्यक्त केली होती.
(हेही वाचा महाराष्ट्रातील कोरोना निर्बंध अजून कडक होणार? राजेश टोपेंचा इशारा)
प्रशासनानेच सत्ताधारी पक्षाला मुठीत ठेवले
त्यातच सोमवारी होणाऱ्या गटनेत्याच्या बैठकीकरता महापौर किशोरी पेडणेकर यांनी सर्व गटनेत्यांच्या पत्र लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी अनेकदा गटनेत्यांची सभा आयोजित केली होती, पण काही आपरिहार्य कारणांमुळे त्या रद्द कराव्या लागल्या, असे म्हणत आयुक्त व गटनेते यांनी यावेळेस सभा रद्द होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी विनती केली आहे. मात्र, ज्या आयुक्तांकडून महापौर आणि गटनेते यांना जुमानले जात नाही, त्याच्याच दालनात आपल्या नेत्यांच्या उपस्थित महापौर तिथे आवर्जुन भेट देत आहेत. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख आणि शिवसेना नेते हेच आपल्या महापौरांना आयुक्तांपुढे नामायला भाग पाडत असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात ऐकायला मिळत आहे. भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी, आपण आजवर असे महापौर पाहिले नसून महापौरांचे आयुक्त ऐकत नाही, गटनेत्यांच्या सभेला येत नाही, यापेक्षा सत्ताधारी पक्षाची मोठी नामुष्की ती कोणती, असा सवाल त्यांनी केला. प्रशासनाला मुठीत ठेवण्याऐवजी प्रशासनानेच सत्ताधारी पक्षाला मुठीत ठेवल्याचे हे ज्वलंत उदाहरण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community