कठोरा (बु) रोडवरील पी.आर.पोटे पाटील शिक्षण संस्थेच्या प्रवेशद्वारासामोर रंगरंगोटी करण्यासाठी आणलेली लोखंडी शिडी बाजूला करण्यासाठी गेलेल्या संस्थेच्या चार शिपायांचा उच्च विद्युत दाबाच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी साडे अकरा वाजताच्या दरम्यान घडली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी पोलिस प्रशासन तसेच विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेतली. चारही मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
१३३ केव्ही दाबाच्या विद्युत प्रवाहाचा शिडीला स्पर्श
अक्षय साहेबराव सावरकर (२६) रा. टाकळी जहागीर, गोकुल शिलाकरम वाघ (२९) रा टाकळी जहागीर, प्रशांत अरुणराव शेलोरकर (३१) रा. शिराळा, संजय बबनराव दंडनाईक (४५) रा.आदिवासी कॉलनी अमरावती. असे घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांचे नाव असून सर्व पी.आर.पोटे पाटील शिक्षण संस्थेमध्ये शिपाई म्हणून कार्यरत होते, आज सकाळी संस्थेत आल्यानंतर हे चारही शिपाई प्रवेशद्वारासमोरील शिडी हटवण्यासाठी गेले होते, मात्र प्रवेशद्वारासमोरूनच गेलेल्या १३३ केव्ही दाबाच्या विद्युत प्रवाहाचा शिडीला स्पर्श झाल्याने चारही कर्मचारी घटनास्थळी मृत्युमुखी पडले.
(हेही वाचा महापौरांकडूनच राजशिष्टाचाराची ऐशी तैशी : कॅबिनेट मंत्र्यांनाही पडला विसर)
चार महिन्याच्या मुलाचे छत्र हरपले
शिराळा येथील प्रशांत शेलोरकर यांचा दीड वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना चार महिण्याचा मुलगा असून घटनेमुळे बाळाचे छत्र हरपले आहे. कुटुंबाची धुरा देखील प्रशांतच्या खांद्यावर असल्याने परिवारावर मोठे संकट कोसळले आहे तर टाकळी येथील अक्षय सावरकर आणि गोकुल वाघ हे दोघेही अविवाहित असल्याची माहिती आहे.तर आदिवासी कॉलनी मध्ये वास्तव्यास असलेले दंडनाईक हे सुद्धा परिवारातील मुख्य सदस्य होते आणि तेच संपूर्ण परिवार चालवायचे.
Join Our WhatsApp Community