मुंबईच्या वांद्रे रेक्लेमेशन परिसरात नाताळ व नव वर्षाचे औचित्य साधत लाईटिंग करण्यात आली होती. कोरोनाचे कोणतेच निर्बंधांचे पालन न करता नागरिक मोठ्या प्रमाणात या भागात गर्दी करत होते. वाढत्या कोविड-१९ प्रकरणांमुळे व नववर्ष स्वागतासाठी होणारी गर्दी लक्षात घेता ‘रेक्लेमेशन- वांद्रे वंडरलँड’ गुरुवारी, 30 डिसेंबर ते 2 जानेवारीपर्यंत पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे. पोलिस उपायुक्त एस चैतन्य यांनी बुधवारी फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) कलम 144 अंतर्गत हे आदेश जारी केले.
रेक्लेमेशन बंद
वांद्रे वंडरलॅंडच्या रोषणाईचे आकर्षण म्हणून रोज हजारो पर्यटक याठिकाणी गर्दी करत होते. त्यामुळे वांद्रे वंडरलॅंड कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण तर देत नाही ना, असे सवाल अनेकांनी उपस्थित केले. परिणामी वाढती कोरोना रुग्ण संख्या आणि होणारी गर्दी यामुळेच रेक्लेमेशन पर्यटकांसाठी २ जानेवारीपर्यंत बंद असणार आहे.
राज्यात निर्बंध
पोलिसांच्या आदेशानुसार हॉटेल, रेस्टॉरंट, बार, रिसॉर्ट्स आणि क्लबसह कोणत्याही बंद किंवा मोकळ्या जागेत नवीन वर्षाचे सर्व उत्सव, कार्यक्रम आणि मेळावे घेण्यास बंदी करण्यात आली आहे. हा आदेश गुरुवारपासून 7 जानेवारी 2022 पर्यंत लागू असेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. बुधवारी, मुंबईत 2 हजार 510 कोविड-19 प्रकरणे नोंदवली गेली. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
( हेही वाचा : ‘थर्टी फस्ट’ला होणारे गैरप्रकार थांबवा! विविध पोलिस ठाण्यांत होतेय मागणी )
महाराष्ट्रात बुधवारी ओमायक्रॉनचे ८५ नवीन रुग्ण आढळले, राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आता एकूण ओमायक्रॉन रुग्णाची संख्या २५२ झाली आहे. राज्यमंत्री आदित्य ठाकरे यांनी लोकांना घाबरू नये, असे आवाहन केले होते, परंतु मुंबईतील कोरोना व्हायरस रुग्णांमध्ये तीव्र वाढ लक्षात घेता अत्यंत सावधगिरी बाळगावी आणि लसीकरण आणि फेस मास्कच्या व्यापक वापर करा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community