नववर्षात देशात मोठ्या प्रमाणात मद्यविक्री केली जाते. कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर देशात पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात आले आहे. 31 डिसेंबर करिता शासनाकडून विशेष नियमावली जारी करण्यात आली आहे. तर, मद्रास उच्च न्यायालयाने बुधवारी पुद्दुचेरीमध्ये नवीन वर्षाच्या रात्री मद्यविक्रीवर तीन तास बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. 31 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजल्यापासून 1 जानेवारी 2022 रोजी सकाळी 1 वाजेपर्यंत ही बंदी लागू राहील. न्यायमूर्ती एस वैद्यनाथन आणि न्यायमूर्ती डी भरत चक्रवर्ती यांच्या खंडपीठाने पुद्दुचेरी येथील रहिवासी जीए जगन्नाथन यांच्या याचिकेवर सुनावणी करताना हा आदेश दिला.
दारू विक्रीवर निर्बंध
पुद्दुचेरीसारख्या पर्यटन स्थळासाठी हा एक विलक्षण निर्णय असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. याचिकाकर्ता जीए जगन्नाथन कोविड -19 चा प्रसार रोखण्यासाठी उत्सवांवर पूर्ण बंदी घालण्याची मागणी करत होता, परंतु मद्रास उच्च न्यायालयाने नवीन वर्षाच्या कार्यक्रमांची अडवणूक न करता त्याऐवजी, बार, बार-संलग्न रेस्टॉरंट्स/हॉटेल्स किंवा सार्वजनिक वापरासाठी इतर कोणत्याही ठिकाणी नमूद केलेल्या वेळेत दारूच्या विक्रीवर निर्बंध घातले आहेत.
( हेही वाचा : रेक्लेमेशन – वांद्रे वंडरलँड ‘या’ तारखेपर्यंत पर्यटकांसाठी बंद! )
रात्रीचा कर्फ्यू
तसेच पुद्दुचेरीमध्ये ज्या लोकांचे लसीकरणाचे दोन्ही डोस झालेले आहेत. अशा लोकांनाच 31 डिसेंबरला संध्याकाळी 7 नंतर सार्वजनिक ठिकाणी परवानगी दिली जाणार आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने गर्दी होऊ नये म्हणून पुद्दुचेरी सरकारने १ जानेवारी २०२२ रोजी रात्री १ ते पहाटे ५ वाजेपर्यंत रात्रीचा कर्फ्यू लागू केला आहे.
Join Our WhatsApp Community