देशभरासह राज्यात ओमायक्रॉनच्या संसर्गाचा धोका वाढताना दिसतोय. राज्यात काल ओमायक्रॉनचे 85 रुग्ण आढळल्याचे राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ प्रदीप आवटे यांनी सांगितले. तर पुण्याच्या आयसर संस्थेने घेतलेल्या 38 नमुन्यांच्या चाचण्यामधून मुंबई, पुण्यात ओमायक्रॉन समूह संसर्ग सुरु झाल्याचे प्राथमिक निदान करण्यात आले आहे. ओमायक्रॉनचा प्रसार वेगाने होत असला तरी रुग्णांना ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरची गरज नसल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आल्याची माहिती प्रदिप आवटे यांनी दिली.
कोविडच्या पार्श्वभूमीवर अधिक काळजी घेणं आवश्यक
विशेष म्हणजे ओमायक्रॉनची बाधा झालेल्या अनेक रुग्णांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केला नसल्याचे निदर्शनास आलेले नाही. त्यामुळे मुंबई आणि पुण्यात ओमायक्रॉनच्या सामूहिक संसर्गाला सुरुवात झाल्याचा अंदाज बांधण्यात आला आहे. ओमायक्रॉनचा संसर्ग असलेल्या रुग्णांमध्ये लक्षणं सौम्य स्वरुपाची आहेत तर काही लक्षणंविरहित रुग्ण अधिक आहेत. मृत्यूचे प्रमाण देखील कमी आहे. मात्र आपण सर्वांनी कोविडच्या पार्श्वभूमीवर अधिक काळजी घेण्याची गरज आहे, नियमांचं काटेकोर पालन करण्याची गरज आहे, असे आवाहन देखील डॉ आवटे यांनी केलं आहे.
(हेही वाचा –कोरोनाची धास्ती कायम! मुंबईत ७ जानेवारीपर्यंत जमावबंदी)
जिनोम स्क्विन्सिंग अहवालानंतरच शिक्कामोर्तब
दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सची बैठक झाली. मुंबईतील ओमायक्रॉनच्या समूह संसर्गावर जिनोम स्क्विन्सिंग अहवालानंतरच शिक्कामोर्तब करण्यात येईल असे निश्चित झाले. या बैठकीत निर्बंध लावण्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. तसेच मुंबईत ओमायक्रॉनचा समूह संसर्ग झाला की नाही हे जिनोम स्क्विन्सिंग अहवालानंतरच स्पष्ट होईल, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त सुरेश काकानी यांनी दिली आहे.