शीव कोळीवाडा गाव येथील सरदार नगरमध्ये इमारतींच्या पुनर्विकासासाठी चक्क ३३ झाडे कापण्यात आली. बांधकामाच्या आड येत नसतानाही या झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात आल्याने विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी याला आक्षेप नोंदवला आहे. एका बाजुला वडाळा टी.टी येथील नाल्याच्या रुंदीकरणासाठी कापण्यात येणाऱ्या झाडांना वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी देण्यात येत नाही आणि खासगी विकासकांना झाडे कापण्यास मात्र झाडे कापण्यास परवानगी दिली जात असल्याने विरोधी पक्षनेत्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. ही सर्व झाडे मोकळ्या जागेवरील होती आणि ती कुठेही प्रस्तावित इमारतीच्या बांधकामांमध्ये येत नाही. त्यामुळे या झाडांच्या कत्तलीला महापालिका आयुक्तच जबाबदार असल्याचा आरोप राजा यांनी केला आहे.
एफ उत्तर विभागातील शीवमधील सरदार नगरच्या इमारतींच्या पुनर्विकासात बांधकामाच्या आड येणारी ३३ झाडे येत आहेत. त्यामुळे २२ झाडे कापण्यास आणि ११ झाडे पुनरोर्पित करण्याचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाच्या जून-जुलैच्या सभेमध्ये मंजुरी देण्यात आली. वृक्ष प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर या इमारतीच्या विकासात आड येणारी ही झाडे कापण्यात आली. मात्र, जी झाडे कापण्यात आली आहे. मात्र, ही बाब जेव्हा एनजीओंनी स्थानिक नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्या निदर्शनास आणून दिली तेव्हा या प्रस्तावाला जुलै महिन्यात मंजुरी दिल्याचे समजले.
आयुक्तांकडे निवेदन
मात्र, याठिकाणी एकप्रकारे झाडांचे जंगल होते. बांधकामांमध्ये येणारी दोन तीन झाडे कापण्यास आमची हरकत नाही, परंतु प्रत्यक्ष बाधकामांमध्ये बाधित होत नसतानाही ही झाडे कापली गेल्याने याबाबतीत तीव्र नाराजी महापालिका आयुक्त व वृक्ष प्राधिकरणाचे अध्यक्ष इक्बालसिंह चहल यांच्याकडे निवेदनाद्वारे नोंदवली आहे. यामध्ये जी ११ झाडे पुनर्रोपित करण्यात येणार आहेत, ती रेल्वेच्या जागेवर लावण्यात आली आहे. या जागेचा भविष्यात रेल्वेकडून विकास केला जाणार आहे. मात्र, रेल्वेच्या जागेवर ही झाडे लावताना कोणत्याही प्रकारची रेल्वेकडून परवानगी घेतली नसल्याची बाब राजा यांनी निदर्शनास आणून दिली आहे.
या एफ उत्तर विभागातील वडाळा टी.टी. येथील नाला रुंदीकरणातील झाडे कापण्याचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाच्या सभेत मंजूर केला जात नाही. पायाभूत विकासाच्या कामांमधील झाडे कापण्यास आयुक्त परवानगी देत नाही आणि दुसरीकडे खासगी विकासकांच्या प्रकल्प कामांमधील झाडे कापण्यास परवानगी दिली जात असल्याचा आरोप राजा यांनी केला आहे. हा प्रस्ताव आठ महिन्यांपासून प्रलंबित असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे या रखडलेल्या नाला रुंदीकरणाच्या कामाला आयुक्तच जबाबदार असल्याचाही आरोप राजा यांनी केला आहे. त्यामुळे बंद डोळे ठेवत कारभार करणाऱ्या आयुक्तांनी आताच डोळे उघडून काम करावे,अन्यथा आम्ही रौद्ररुप धारण केल्याशिवाय राहणार नाही असाही इशारा राजा यांनी दिला आहे.
मागील सन २०१० ते २०२१पर्यंत एकूण ३८ हजार १७७ झाडे कापण्यास परवानगी दिली गेली. तर ३६ हजार झाडे पुनर्रोपित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यातील २१ हजार झाडे ही खासगी विकासकांच्या बांधकामांमधील बाधित आहेत. एका बाजुला राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे झाडे न कापण्याच्या भूमिकेत आहेत. परंतु दुसरीकडे त्यांच्याच मर्जीतील आयुक्त हे झाडे कापण्यास परवानगी देत आहेत. आज झाडे कापण्यास परवानगी दिली जात नाही म्हणून मेट्रो रेल्वे प्रकल्पांसह नाले रुंदीकरणाची कामे बंद आहेत, मात्र, खासगी विकासकांच्या बांधकामांच्या आड येणारी झाडे हटवण्यास तथा कापण्यास बिनदिक्तत परवानगी दिली जात असल्याने आदित्य ठाकरे आयुक्तांना काय सल्ला देतात याची प्रतीक्षा मुंबईकरांना आहे.
( हेही वाचा : सुरु होण्यापूर्वीच ‘बायोमेट्रीक’ हजेरीला कामगार संघटनांचा विरोध )
स्वाक्षरी करणारी काँग्रेस नगरसेविका
शीवमधील जी झाडे कापण्यास वृक्ष प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे, त्या जागेची पाहणी वृक्षप्राधिकरण सदस्या सुषमा राय यांनी केली असून त्यांच्या सहमतीनंतरच हा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आला. त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांच्या विभागातील झाडे कापण्यास काँग्रेस नगरसेविकेने परवानगी दिल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याची शिफारस विरोधी पक्षनेते यांनी मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्याकडे केली आहे. दरम्यान राय यांचे पती यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे आणि त्यांचा मुलगा युवा सेनेचा पदाधिकारी आहे. त्यामुळे शिवसेनेत प्रवेश केल्याने राय या काँग्रेसला जुमानत नसल्याचे पहायला मिळत आहे.
Join Our WhatsApp Community