मुंबई पोलिस दलाच्या जेस्सीने पोलिसांची लाज राखली आहे, दहिसर येथील बँक दरोड्यातील आरोपींना पकडून देण्यात जेस्सीने मोलाची कामगिरी बजावली आहे. बँक दरोड्यातील आरोपींना ८ तासांत अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले असले, तरी त्यात सर्वात मोठा यशाचा वाटा ‘जेस्सी’चा आहे. जेस्सी ही मुंबई पोलिस दलातील श्वान आहे, तिनेच आरोपीच्या स्लिपरच्या वासावरून पोलिसांना आरोपी पर्यत पोहचवले.
झोपड्यात लपून बसलेल्या दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या
दहिसर पश्चिमेकडे असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत बुधवारी दुपारी भरदिवसा दोन तरुणांनी गोळीबार करून २ लाख ७० हजारांची रोकड लुटून पोबारा केला होता. या गोळीबारात बँकेतील कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. भरदिवसा घडलेल्या या दरोडाच्या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडवून दिली होती. दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी संपूर्ण उत्तर प्रादेशिक विभागातील सुमारे १०० पोलिस अधिकारी आणि कर्मचारी कामाला लागले होते. त्यात मुंबई पोलिस दलाच्या श्वान पथकाचा समावेश होता. श्वान पथकात जेस्सी ही मादी श्वान आणि तिला हाताळणारी पोलिस अंमलदार सुरेखा लोंढे या शोध पथकात होते. दोन दरोडेखोरांपैकी एक जण आपल्या पायातील एक स्लीपर बॅंकेजवळ सोडून पळून गेला होता, जेस्सी त्या स्लिपरचा वास घेत पोलिसांना दरोडेखोर पळून गेल्याच्या दिशेने घेऊन गेली, दहिसर पूर्वेत असणाऱ्या रावळपाडा येथील एका झोपडीजवळ जेस्सी थांबली. त्याच ठिकाणी एका झोपडीत लपून बसलेल्या दोन्ही दरोडेखोरांच्या मुसक्या आवळ्यात पोलिसांना यश आले.
(हेही वाचा राज्यात कोरोना आलेख पोहोचला ८ हजारांवर…)
जेस्सीने यापूर्वी धारावीतील एक हत्येचा गुन्हा उघडकीस आणला
जेस्सी ही ३ वर्षांची बेल्जियन मालिनॉईस या मादी जातीचे श्वान आहे. मुंबई पोलिस दलात जेस्सी तीन वर्षांपूर्वी आली होती. २०१९ मध्ये तत्कालीन पोलिस आयुक्त सुबोध जयस्वाल यांनी पाच श्वानांची पिल्ले आणली होती, त्यात जेस्सी देखील होती. जेस्सीचे प्रशिक्षण राजस्थान च्या एसएसबी कॅम्पमध्ये झाले आहे. जेस्सीने यापूर्वी धारावीतील एक हत्येचा गुन्हा उघडकीस आणला होता. बेल्जियन मालिनॉईस जातीच्या श्वानांची वास घेण्याची शक्ती जास्त असते, या श्वानाचा वापर एनएसजी (राष्ट्रीय सुरक्षा गार्ड) मध्ये केला जातो या श्वान पथकाला के-९ हे नाव देण्यात आले आहे.