सोमवारपासून देशभरात 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यातील महिला आणि बाल रुग्णालयात उपस्थीत राहून या लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना, राज्यात लाॅकडाऊन लागणार का? यावर त्यांनी राज्याची स्पष्ट भूमीका मांडली आहे. तसेच, राज्याला किती आणि कोणत्या लसींची आवश्यकता आहे? या जनतेच्या अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांनी यावेळी दिली.
प्रत्येक राज्याची वेगळी परिभाषा
राज्यात लाॅकडाऊन लागणार का? या प्रश्नाला उत्तर देताना राजेश टोपे म्हणाले की, रविवारी मी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांची भेट घेतली. आमच्यात झालेल्या बैठकीत लाॅकडाऊनचा मुद्दा निघाला. त्यावेळी लाॅकडाऊनची परिभाषा वेगवेगळी मांडण्यात आली. महाराष्ट्रात उपलब्ध बेड किती? तसेच त्या बेडची ऑक्यूपन्सी किती? किती बेड ऑक्यूपाय झाले? समजा, 40 टक्क्यांपर्यंत ऑक्यूपाय झाले आणि ऑक्सिजन कन्झम्प्शन दररोजचं 700 मॅट्रीक टन वाढलं तर महाराष्ट्रात लॉकडाऊन करावं असा निकष लावून आम्ही परिभाषा केली आहे. आता प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने लॉकडाऊनची परिभाषा सुरू आहे. हरियाणात लॉकडाऊन लागल्याचं कळलं. दिल्लीतही चर्चा आहे. आम्ही केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना सांगितलं, एकच परिभाषा असावी. आयसीएमआरने सर्वच राज्यांना निर्बंध आणि लॉकडाऊनबाबत समान नियम लागू केला पाहिजे.
( हेही वाचा: मध्य रेल्वेने प्रवास करताय, तर आठवडाभर घरातून लवकर निघा! कारण…)
राज्याला किती लशींची आवश्यकता?
15 ते 18 वयोगट हा खूप फिरणारा ग्रुप असतो. या ग्रुपमध्ये लसीकरणाची गरज होती. केंद्रीय मांडवीयांसोबत रविवारी झालेल्या बैठकीत मी हा मुद्दा मांडला. 12 वर्षांच्या मुलांनाही लस देण्याची मागणी केली आहे. तसेच एमर्जन्सी सर्व्हिसमधील कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर, आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यासाठी कोविशिल्ड 40 लाख आणि कोव्हॅक्सिनचे 50 लाख डोसची गरज राज्याला असल्याचही सांगितलं आहे. या लसींचा राज्यांना पुरवठा केला पाहिजे, अशी मागणी करण्यात आल्याचं, राजेश टोपे यावेळी म्हणाले.
Join Our WhatsApp Community