नववर्षाच्या पूर्वसंध्येला वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरी होऊन १२ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर मंदिर प्रशासनाने मंदिराच्या संकुलात गर्दी होऊ नये याकरिता काही महत्वाची पावले उचलली आहेत. लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी स्थापन केलेल्या चौकशी समितीने घटनास्थळाला भेट दिली आणि घटनेबद्दलचे व्हिडिओ, विधाने, पुरावे शेअर करण्याचे आवाहन केले आहे. तसेच मंदिर व्यवस्थापनाने ऑनलाईन नोंदणी करून दर्शन घ्या, असे आवाहन भाविकांना केले आहे.
प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
शनिवारी २७ हजाराहून अधिक यात्रेकरूंनी मंदिराला भेट दिली होती, तर रविवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत १५ हजाराहून अधिक यात्रेकरूंनी भेट दिली होती. असे मुख्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. चेंगराचेंगरीत १२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १६ जण जखमी झाले. चेंगराचेंगरीचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले आहेत. नववर्षानिमित्त वैष्णोदेवी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक पोहोचले होते. दरम्यान, चेंगराचेंगरी झाली त्यामुळे अनेक भाविक दर्शन न घेताच परतले. मृतांमध्ये दिल्ली, हरियाणा, पंजाब येथील भाविकांचा समावेश आहे.
ऑनलाइन बुकिंग
याच पार्श्वभूमीवर वैष्णोदेवी मंदिर प्रशासनाने यात्रेकरूंना ऑनलाइन बुकिंग करूनच दर्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण ट्रॅकवरील गर्दी कमी करणे, रांग व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला जाईल असे आश्वासन सिन्हा यांनी दिले आहे. या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या भाविकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपये अनुदान देण्याची घोषणाही त्यांनी केली. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दररोज ५० हजार यात्रेकरूंची मर्यादा घालण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community