कचरा ज्या ठिकाणी निर्माण होतो, त्याच ठिकाणी त्या कच-याचे वर्गीकरण करणे बंधनकारक आहे. अशा प्रकारे वर्गीकृत कच-याचे सुयोग्य वहन व्हावे, यासाठी महानगरपालिकेच्या स्तरावर स्वतंत्र कप्पे असलेल्या वाहनांचा वापर करण्यात येतो. परंतु कचरा वर्गीकृत करण्याबाबत समस्या असल्यास किंवा काही माहिती हवी असल्यास किंवा कचरा वहनाबाबत काही तक्रार करावयाची असल्यास, नागरिकांनी १८००-२२-१९१६ या स्वतंत्र ‘टोल फ्री’ दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
सकाळी ९ ते सायंकाळी ६ या दरम्यान संपर्क साधता येईल
‘घन कचरा व्यवस्थापन नियमावली, २०१६’ नुसार, सर्व नागरिकांनी त्यांच्या स्तरावर तयार होणारा कचरा हा ‘ओला- सुका व घातक’ इत्यादी प्रकारात वर्गीकरण करण्यात येतो. हा कचरा वर्गीकृत केल्यानंतरच तो कचरा गोळा करणा-या संस्थेकडे हस्तांतरित करणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात घन कच-याची निर्मिती होते, अशा ठिकाणच्या संबंधित संस्थांनी जसे की हाऊसिंग सोसायटी आदी ठिकाणीच प्रक्रिया करणे आवश्यक आहे. या अनुषंगाने कच-याचे वर्गीकरण, वर्गीकृत कच-याचे वहन व त्याविषयी येणा-या संभाव्य समस्या याबाबत नागरिकांना यथोचित मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन खात्याच्या पुढाकाराने १८००-२२-१९१६ हा स्वतंत्र ‘टोल फ्री’ दूरध्वनी क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. या दूरध्वनी क्रमांकावर नागरिकांना सकाळी ९ ते सायंकाळी ६ या दरम्यान संपर्क साधता येईल, असे घन कचरा व्यवस्थापन खात्याच्या उप आयुक्त डॉ. संगिता हसनाळे यांनी कळविले आहे.
(हेही वाचा आमदार कारोमोरेंना अटक, पोलिसांना केली अश्लील शिवीगाळ)
कच-याचे सुव्यवस्थापन नियमितपणे व सातत्यपूर्ण पद्धतीने केले जाते
मुंबई महानगरपालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन खात्याद्वारे मुंबईत कच-याचे सुव्यवस्थापन नियमितपणे व सातत्यपूर्ण पद्धतीने केले जाते. या अनुषंगाने ‘घन कचरा व्यवस्थापन नियमावली, २०१६’ नुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी व करून घेण्यासाठीही मुंबई महानगरपालिका अव्याहतपणे कार्यरत असते. त्यानुसार मुंबईकरांना वर्गीकरण केलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावता यावी, यासाठी हा टोल फ्रि क्रमांक देण्यात आला असल्याचे हसनाळे यांनी स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community