ज्यांचे कुणी नाही, त्यांच्या सिंधुताई सपकाळ आई बनल्या. उभे आयुष्य अनाथांची आई म्हणून जीवन व्यथित करणा-या सिंधुताई यांचे मंगळवारी, ४ जानेवारी रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. मागील दीड महिने त्यांच्यावर पुण्यात रुग्णालयात उपचार सुरू होते. रात्री सव्वा आठ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. सिंधुताई यांच्यावर बुधवारी, दुपारी बारा वाजता पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. सिंधुताई यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले हाते.
मंगळवारी रात्रीपर्यंत सिंधुताई सपकाळ यांच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. अखेर ड़ॉक्टरांच्या उपचाराला सिंधुताई यांच्या शरीराने प्रतिसाद देणे बंद केले. अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली.
(हेही वाचा रश्मी ठाकरे मुख्यमंत्री होणार! शिवसेनेच्या नेत्याच्या वक्तव्याने चर्चेला उधाण)
अशी सुरू केली समाजसेवा!
१९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. ममता बाल सदन संस्थेत लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले जाते. आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते. अशी सुमारे १०५० मुले या संस्थेत राहिलेली आहेत.
महानुभाव पंथानुसार अंत्यसंस्कार
सिंधुताई सपकाळ 74 वर्षांच्या होत्या. त्यांचे पार्थिव उद्या सकाळी 8 वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 12 वाजता ठोसर पागेत महानुभाव पंथानुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. सिंधुताई यांना पद्म पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील.
सिंधुताई सपकाळ यांचा जीवनप्रवास
सिंधुताई सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला होता. वर्धा जिल्ह्यातील नवरगाव ही सिंधुताई यांची जन्मभूमी. त्यांचा विवाह वयाच्या 9 व्या वर्षी वयाने 26 वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी झाला होता. घरी प्रचंड सासुरवास होता. कुटुंबात शैक्षणिक वातावरण नव्हते. नवऱ्याने चारित्र्याचा संशय घेऊन त्यांना घराबाहेर काढले. घरच्यांनीही त्यांच्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे परभणी-नांदेड-मनमाड रेल्वे स्टेशनांवर सिंधुताई भीक मागत हिंडायच्या. एकदा तर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. अनेक दिवस भीक मागितल्यानंतर त्या स्मशानातही राहिल्या. त्यानंतर त्यांनी अनाथ मुलांना सांभाळण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी ममता बाल सदनची स्थापनाही केली. पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली. अनाथ, बेवारस मुलांना सांभाळतानाच त्यांना शिक्षण, अन्न, कपडे देण्यास त्यांनी सुरुवात केली. या संस्थेत 1 हजार 50 मुले या राहिलेली आहेत. त्यांनी पुण्यात बाल निकेतन, चिखलदरा येथे सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह, वर्ध्यात अभिमान बाल भवन, गोपिका गाईरक्षण केंद्र, सासवडमध्ये ममता बाल सदन आणि पुण्यात सप्तसिंधु महिला आधार बालसंगोपन व शिक्षण संस्थेची स्थापना केली.
सिंधुताई यांनी स्थापन केलेल्या संस्था
- बाल निकेतन हडपसर, पुणे
- सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह , चिखलदरा
- अभिमान बाल भवन, वर्धा
- गोपिका गाईरक्षण केंद्र, वर्धा ( गोपालन)
- ममता बाल सदन, सासवड
- सप्तसिंधु महिला आधार बालसंगोपन व शिक्षणसंस्था, पुणे