माय बना, मादी नको! स्त्रियांसाठी सिंधुताईंची काय होती शिकवण?

135

महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, असे आपण म्हणतो. पण वाढत्या अत्याचारांना महिलाही जबाबदार आहे. तिने उघडे-नागडे प्रदर्शन करू नये, आपली पायरी राखून वागावे. मुळात महिलांनी स्वत:भोवती काही चौकटी आखून घेतल्या पाहिजेत. निर्मिती तिच्या हाती आहे. संस्कार तिच्या हाती आहेत. महिलांमध्ये समाजाला ‘मादी’ नाही तर ‘माय’ दिसली पाहिजे, अशी शिकवण सिंधुताई सपकाळ द्यायच्या.

…तरी कुणी माझ्यावर हात टाकला नाही!

मीही उघड्यावर झोपले. भिकाऱ्यांमध्ये राहिले. पण, कुणी माझ्या अंगावर हात नाही टाकला. मी त्यांना भाकर पुरविली. माझ्यात त्यांना अन्नदाता दिसली. पायरी राखून वागले की काही समस्या उद्भवत नाही, असे सिंधुताई म्हणत. नागपुरात एका कार्यक्रमात सिंधुताईंनी स्त्री, पुरुष, गरिबी, सरकार अशा सर्व विषयांना स्पर्श करत परखड मते मांडली होती. ग्रामीण भाग पिंजून काढणाऱ्या सिंधुताईंनी अभावग्रस्त समाज पाहिला. आत्महत्याग्रस्त कुटुंबातील पुरुष मरतो. बाई मात्र दु:खातून स्वत:ला सावरते अन् कुटुंबही सावरते. तिच्यातील हा खंबीरपणा पुरुषांनाही कळला पाहिजे, अशी कळकळ सिंधुताईंच्या बोलण्यातून कायम जाणवली.

(हेही वाचा हजारो अनाथांची हरपली ‘आई’!)

सरकारच्या मदतीशिवायही जगता आले पाहिजे

काटेरी आयुष्याशी अतूट नाते निर्माण झालेल्या माईंनी अनेकांच्या आयुष्यात फुलांचे मळे फुलवले. ‘ही ऊर्जा मला काट्यांनीच दिली. हरले असते तर सरले असते. ज्या माहेर-सासरने हाकलून दिले होते त्याच जिल्ह्यातील सत्कार केल्यामुळे भरून पावले.’ प्रत्येक ठिकाणी सरकार पोहोचू शकत नाही. नुकसान झाले असल्यास ते भरून काढण्याची उमेद निर्माण केली पाहिजे. प्रत्येकवेळी सरकारकडे हात पसरवून होत नाही. सरकारच्या मदतीशिवायही जगता येते ही माझ्या संस्थांनी दाखवून दिले आहे, असेही सिंधुताई म्हणाल्या होत्या.

लिहायचे होते स्वतःचे समग्र आत्मचरित्र

अनाथांच्या ‘माई’ म्हणून उभे आयुष्य जगलेल्या सिंधुताई यांचे १९८८ मध्ये ‘वनवासी’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले. त्यांच्यावर चित्रपटही निघाला. पण त्यात प्रत्यक्ष माई नव्हत्या. समाजासमोर आतापर्यंत जे काही आले ते अपूर्ण असल्याचे माईंना वाटत राहिले. या जाणिवेतूनच माईंनी स्वतःचे समग्र आत्मचरित्र लिहिणार असल्याचे जाहीर केले होते. ‘माझ्या आयुष्याचा संपूर्ण प्रवास मला माझ्या हाताने लिहायचा आहे. मी आत्मचरित्र लिहिणार आहे. यात कुणावर टीका राहणार नाही, विषयावर फुंकर मात्र जरूर घालेन, अशी इच्छा सिंधुताईंनी व्यक्त केली होती, त्यांची ती इच्छा अपूर्णच राहिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.