एसटी महामंडळात भरती! ५५ हजार संपकरी कर्मचाऱ्यांना नोटीस

161

मागील अडीच महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी पगारवाढी संदर्भात घोषणा करूनही अद्यापही कर्मचारी वर्ग कामावर रुजू झालेला नाही. या संपकाळात एसटी आगार सुरू झाले असले तरीही एसटीच्या फेऱ्या बंद आहेत. लालपरीची नाळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याशी जुळली आहे. एसटी बंद झाल्यामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. यावर तोडगा काढत महामंडळाने सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर बोलावण्याची तयारी सुरू केली आहे. तसेच कंत्राटी भरतीसाठी अर्ज मागवत, ५५ हजार संपकऱ्यांना महामंडळाने नोटीस बजावली आहे.

५५ संपकऱ्यांना नोटीस

आजवर ११ हजार ०२४ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. याचबरोबर एसटीने आता तब्बल ५५ हजार संपकरी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच या ५५ हजार कर्मचाऱ्यांना संप काळातील पगार मिळणार नसल्याची घोषणा महामंडळाने घेतली आहे.

( हेही वाचा : अजित पवारांच्या उपस्थितीत ‘लॉकडाऊन’चा महत्त्वपूर्ण निर्णय, वाचा… )

कंत्राटी कर्मचाऱ्यांची नेमणूक 

महामंडळाची सेवा पूर्ववत करण्यासाठी एसटी महामंडळाने कंत्राटी चालकांची नेमणूक करायचे ठरवले आहे. करार पद्धतीने भरती करण्यासाठी महामंडळाने अर्ज मागवले आहेत. या कंत्राटी चालकाकडे अवजड वाहन चालवण्याचा किंवा प्रवासी वाहन चालवण्याचा किमान एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. त्याशिवाय संबंधित उमेदवाराकडे अवजड वाहन चालवण्याचा परवाना व पीएसव्ही बॅच असणे आवश्यक आहे. यानुसार नियुक्ती करून देणाऱ्या संस्थांनी महामंडळाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

निवृत्त कर्मचाऱ्यांना कामावर बोलावले

मुंबई सेंट्रल आगारात केवळ सातारा व कोल्हापूर याच एसटी फेऱ्या सुरु आहेत. तर, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या भागातील एसटी सेवा ठप्प असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मर्यादित चालक-वाहक हजर असल्याने एसटी सेवा पूर्ववत होऊ शकली नाही. एसटीच्या साध्या गाड्या तसेच विशेष सेवाही सुरू व्हाव्यात याकरिता महामंडळाने महत्वपूर्ण निर्णय घेत कोरोना काळात निवृत्त झालेल्या चालक-वाहक पदावरील कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर बोलावले आहे. यासाठी आवश्यक प्रक्रिया सुद्धा सुरू करण्यात आली आहे. अशी माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. ज्यांचे वय ६२ वर्षापेक्षा कमी कमी अथवा ६२ वर्षे पूर्ण होण्यास ६ महिने बाकी अशा कर्मचाऱ्यांना करार पद्धतीवर रुजू करून दरमहा २६ हजार पगार देणार असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.