देशाला कोविडच्या तिस-या लाटेच्या उंबरठ्यावर नेणा-या ओमायक्रॉन विषाणूच्या लक्षणांबाबत आता वैद्यकीय क्षेत्रातून खातरजमा होत आहे. ओमायक्रॉनचा विषाणू रुग्णाच्या शरीरात प्रवेश केल्यानंतर घसा खवखवणे आणि श्वसनाच्या तक्रारी दिसून येत असल्याची माहिती कुर्ला येथील कोहिनूर रुग्णालयाचे कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. संजय हेलाले यांनी दिली. रुग्णांकडून या तक्रारी सर्रास येत असल्याची माहिती डॉ. हेलाले यांनी दिली.
ओमायक्रॉन विषाणू हा डेल्टा विषाणूपेक्षाही वेगाने पसरत असल्याने आता रुग्णांची संख्या देशपातळीवर दर दिवसाला हजारांच्या संख्येत पोहोचण्याची भीती व्यक्त होत आहे. जनुकीय अहवालानंतरच कोविडबाधा झालेल्या रुग्णाला ओमायक्रॉन झाला की नाही, याबाबतचे निदान होत आहे. या रुग्णांमध्ये कित्येकदा कोविडसंबंधित लक्षणेही दिसून आलेली नाही. कित्येक रुग्णांना सौम्य ताप असल्याचे दिसून आले. मात्र तापापेक्षाही श्वसनाच्या समस्या (अप्पर रेस्पिरेटरी) ओमायक्रॉनच्या रुग्णांना जाणवत असल्याचे डॉ. हेलाले यांनी सांगितले तर ओमायक्रोनबाधित रुग्णांमध्ये घसा खवखवणे, सुका खोकला आणि घशात जखमाही दिसून येत असल्याचे ते म्हणाले.
( हेही वाचा : शासकीय आणि महापालिका कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी ‘या’ तारखेपर्यंत बंद! )
या रुग्णांवर त्वरित उपचार होऊन घरीही आठवड्याभरानंतर पाठवले जात असले तरीही किमान दहा दिवसांची विश्रांती आवश्यक असल्याचा सल्ला डॉ. हेलाले यांनी दिली. रुग्णाला मधुमेह, श्वसनासंबंधीचे इतर आजार किंवा रक्तदाबाचा त्रास असल्यास घरी परतल्यानंतरही किमान दोन आठवड्यांची विश्रांती गरजेची असल्याची माहिती डॉ. हेलाले यांनी दिली.
देशात ओमायक्रॉनचा पहिला बळी
बुधवारी देशात ओमायक्रॉनने पहिला बळी घेतला. राजस्थानातील ७३ वर्षीय ओमायक्रॉनबाधित वृद्धाचा गेल्या आठवड्यात ओमायक्रॉनची बाधा झाल्यानंतर मृत्यू झाला. रुग्णाला मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच इतर आजारही होते, अशी माहिती उदयपूरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश खारादी यांनी दिली.
ओमायक्रॉनबाबत दुर्लक्ष नको
ओमायक्रॉन रुग्णांना डेल्टाबाधित रुग्णांपेक्षा तुलनेने कमी रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावा लागत असला, तरीही या विषाणूमुळेही मृत्यूच्या नोंद होत आहे. ओमायक्रॉनला सामान्य सर्दीच्या लक्षणांसारखे उपचार देता येत नाही. या विषाणूबाबत दुर्लक्ष नको. असे जागतिक आरोग्य संघटनेच्या संसर्गरोगतज्ज्ञ (कोरोना) आणि तांत्रिक प्रमुख मारिया व्हॅन केरखॉव्ह यांनी स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community