मुंबईतील समुद्र किनाऱ्यांवर मागील तीन वर्षांपासून जीव रक्षकांना तैनात करण्यात येत असले तरी भविष्यात अशा प्रकारचे जीव रक्षक तैनात करण्यासाठी कोणतीही नवीन संस्था पुढे येताना दिसत नाही. तीन वर्षांपूर्वी मुंबईतील सर्व समुद्र किनाऱ्यांवर खासगी संस्थेच्या माध्यमातून जीव रक्षक नेमण्यात आले असले, तरी त्यांचे कंत्राट संपल्यानंतर एकही संस्था पुढे येत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा त्याच संस्थेला मार्चपर्यंतची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे या सर्व चौपाट्यांवर तैनात करण्यात येणाऱ्या जीव रक्षकांसाठी मासिक ३५ लाख रुपये खर्च केले जात आहेत.
लाईफ सेव्हिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची केलेली निवड
राज्यातील समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांसाठी सुरक्षा व्यवस्था आवश्यकतेनुसार पुरवण्याची जबाबदारी महापालिकेवर सोपवण्यात आली असून उच्च न्यायालयानेही मुंबईतील समुद्र किनाऱ्यांवर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश दिल्याने महापालिकेने जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०२१ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, आक्सा व गोराई आदी समुद्र किनाऱ्यांवर खासगी संस्थेच्यावतीने जीव रक्षक तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला. या तिन्ही ठिकाणी जीव रक्षक तैनात करण्यासाठी दृष्टी लाईफ सेव्हिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आले होते.
(हेही वाचा रश्मी ठाकरेंची राबडी देवींशी तुलना! भाजपचा पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात)
२९ डिसेंबरपर्यंत दोनदा मुदतवाढ
परंतु यांचे कंत्राट ३१ डिसेंबर २०२१ रोजी संपुष्टात येत असल्याने महापालिकेने १५ डिसेंबरपासून निविदा प्रक्रिया राबवण्यास सुरुवात केली. परंतु या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने २९ डिसेंबरपर्यंत दोनदा मुदतवाढ दिली, तरी एकही संस्था पुढे न आल्याने अखेर महापालिकेने विद्यमान संस्थेलाच पुढील तीन महिने जीव रक्षकांची सेवा पुरवण्याचे काम वाढवून दिले आहे. त्यामुळे या तीन महिन्यांसाठी सुमारे एक कोटींहून अधिक कोटींचे वाढीव काम संस्थेला देण्यात आले आहे.
- गोराई चौपाटी : तीन पाळ्यांमधील जीवरक्षक १९
- मासिक खर्च : ६ लाख ७२ हजार २३८ रुपये
- वर्सोवा, जुहू व आक्सा चौपाटी : तीन पाळ्यांमधील जीव रक्षक ४८
- मासिक खर्च : १७ लाख ८६ हजार ६७० रुपये
- दादर, चौपाटी : तीन पाळ्यांमधील जीवरक्षक: २७
- मासिक खर्च : १० लाख ३९ हजार २५४ रुपये