बुली बाई या वादग्रस्त अॅप प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला आसाममधून अटक करण्यात आल्याचा दावा ‘इंटेलिजन्स फ्यूजन आणि स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स युनिट’ च्या दिल्ली विशेष सेलने केला आहे. आसाममधून अटक करण्यात आलेला तरुण हा बुली बाई अॅपचा निर्माता असून या तरुणाच्या अटकेनंतर या प्रकरणाचा तपास जवळ जवळ संपला असल्याचे बोलले जात आहे.
प्रतिष्ठित मुस्लिम महिलांचे छायाचित्रे बुली बाई अॅपवर टाकून या महिलांची बोली लावली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. मुंबई पोलिसांच्या सायबर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल होताच सायबर पोलिसांनी याप्रकरणी बंगळुरू आणि उत्तराखंड येथून तिघांना अटक केली होती. कुमार विशाल झा, श्वेता सिंह आणि मयंक रावत असे अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. हे प्रकरण सुरु असताना @giyu44 या ट्विटर खात्यावरून नेपाळी तरुणाने बुली बाई अॅप प्रकरणाशी संबंधित ट्विट करून मुंबई पोलिसांना उद्देशून ‘तुम्ही चुकीच्या व्यक्तींना अटक केली आहे, या अॅपचा निर्माता मी आहे’, असे ट्विट केले होते.
(हेही वाचा पुण्यात मुंढवा पोलिसांनी ‘सिंबा’ स्टाईलने केली धडकेबाज कारवाई!)
आसाम येथून निरज दशरथ बिश्नोई या तरुणाला अटक
दरम्यान या प्रकरणात दिल्ली सायबर पोलिस ठाण्यात आणखी एका महिलेने बुली बाई अॅप प्रकरणी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून ‘इंटेलिजन्स फ्यूजन आणि स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स युनिट’ दिल्लीच्या विशेष सेलने तांत्रिक तपासावरून बुली बाई अॅपचा निर्माता आसाम राज्यातील जोरहाट येथील असल्याचे माहिती मिळाली. आयएफएसओच्या विशेष पथकाने आसाम येथून निरज दशरथ बिश्नोई या तरुणाला अटक केली आहे. चौकशीत त्याने गिटहब या ओपन प्लँटफाँर्मवर बुली बाई अॅप तयार केल्याची कबुली दिली आहे. तसेच त्याने बुली बाईचे ट्विटर हँडल आणि इतर नावाचे हँडल देखील तयार केले होते आणि पुढे त्याने हा देखील खुलासा केला की गीटहब अँप नोव्हेंबर २०२१ मध्ये विकसित केले गेले आणि शेवटी डिसेंबर २०२१ मध्ये अँप अपडेट केले गेले, याचे ट्विटर खाते ३१ डिसेंबर रोजी तयार केले गेले. अटक करण्यात आलेल्या नीरजने असेही सांगितल्याचे अधिकारी यांचे म्हणणे आहे. या अँपबद्दल ट्विट करण्यासाठी त्याने @Sage0x1 हे आणखी एक ट्विटर खाते देखील तयार केले असल्याचे सांगितले. नीरज हा भोपाळच्या वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून बीटेक (कॉम्प्युटर सायन्स)चे शिक्षण घेत आहे. नीरज बिश्नोई याच्या अटकेमुळे वादग्रस्त बुली बाई अॅप प्रकरण पूर्णपणे मिटले असल्याचा दावा आयएफएसओच्या विशेष पथकाने केला आहे.
Join Our WhatsApp Community