कोविड बाधित रुग्णांची संख्या सलग दुसऱ्या दिवशी पाच हजारांनी वाढली असून बुधवारी जिथे १५ हजार १६६ नवीन रुग्णांची भर पडली होती, तिथे गुरुवारी पाच हजारांनी वाढ होत २० हजार १८१ रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांपैकी १,१७० रुग्णांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. यापैकी १०६ रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासली गेली आहे. मुंबईत २० हजार रुणांची संख्या पार झाल्यास लॉकडाऊन केला जाईल, असे महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी मत जाहीर केले होते. त्यामुळे महापौर, आयुक्तांच्या संकल्पनेतील लॉकडाऊनचा आकडा पार झालेला असून प्रशासन लॉकडाऊन की कडक निर्बंध लादते याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.
( हेही वाचा : महापालिकेच्या १४१ मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना ५० लाख रुपयांची मदत )
चार रुग्णांचा मृत्यू
मंगळवारी जिथे १० हजार ८६० रुग्ण आढळून आले होते, तिथे बुधवारी ६० हजार ०१४ चाचण्या केल्यानंतर १५ हजार १६६ नवीन रुग्ण आढळून आले होते, तर गुरुवारी ६७ हजार ४८७ चाचणी केल्यानंतर २० हजार १८१ रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे चारही रुग्ण दीर्घकालिन आजारी होते. यामध्ये १ रुग्ण पुरुष आणि तीन महिला रुग्णांचा समावेश होता. या चारही रुग्णांचे वय साठी पार होते. याशिवाय दिवसभरात २,८३७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबईतील विविध कोविड सेंटर आणि रुग्णालयांमध्ये ५ हजार ९९८ रुग्ण उपचार घेत असून सक्रिय रुग्णांची संख्या ७९ हजार २६० एवढी आहे. तर रुग्ण दुपटीचा दर हा ७० दिवस एवढा होता. बुधवारी झोपडपट्यांमधील कंटेन्मेंट झोनची संख्या ही २० एवढी होती, तर गुरुवारी ही संख्या ३२ एवढी होती, तर सीलबंद इमारतींच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत ४६२ वरून ५०२ एवढी झाली आहे.
दिवसभरातील रुग्ण संख्या
- एकूण बाधित रुग्ण : २०,१८१
- बाधित पैकी लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या: १७,१५४(८५ टक्के)
- गुरुवारी रुग्णालयात दाखल झालेले रुग्ण : १,१७०
- दाखल रुग्णांपैकी ऑक्सिजन बेडवरील रुग्ण संख्या : १०६
- एकूण दाखल रुग्ण : ५,९९८
- एकूण सक्रिय रुग्णांची संख्या : ७९ हजार २६०
- एकूण उपलब्ध रुग्ण खाटा : ३५,५९४
- रुग्ण दाखल असलेल्या खाटांची टक्केवारी : १६.८टक्के
- बरे झालेले रुग्ण : २८३७
- दिवसभरातील मृत रुग्णाची संख्या: ०४
- दिवसभरात केलेल्या कोविड चाचण्या : ६७,४८७
- कंटेन्मेंट झोपडपट्टी: ३२
- सीलबंद इमारती : ५०२