बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील केवळ दोन सिंहाच्या बळावर सुरु असलेल्या सिंह सफारीला लवकरच टाळे लागण्याची भीती व्यक्त होत आहे. दोन सिंहापैकी एक वयोवृद्द सिंह पिंज-यातच बंदिस्त असून, दुसरा वयोमानाकडे झुकलेल्या सिंहाला गेली कित्येक वर्ष जोडीदार मिळालेला नाही. गेल्या वर्षी तेलंगणाहून मिळणारी सिंहाची नवी जोडीही आता नॅशनल पार्कला मिळणे दूरापास्त झाले आहे. त्यामुळे वेळीच नव्या सिंहांची जोडी परराज्यातून नॅशनल पार्कमध्ये रवाना झाली नाही, तर कालांतराने सिंह सफारी बंदच करावी लागेल, अशी वेळ संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनावर येऊन ठेपली आहे. त्यात केवळ पर्यायी पिंज-यातूनच (सेकंडरी कॅज) वाघ आणि सिंह सफारी दाखवून उद्यान प्रशासनाने पर्यटकांची लूटमार सुरुच ठेवली आहे.
( हेही वाचा : कोरोना रुग्णांचा राज्यात नवा रेकॉर्ड…सरकारी आणि खासगी डॉक्टरांनाही कोरोनाची लागण )
तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथील नेहरु झुओलोजिकल पार्कमधून एक सिंहाची जोडी देण्याबाबत गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात वनविभागाने तेलंगण वनविभागाला पत्र व्यवहार केला होता. मोबदल्यात एक वाघाटीची जोडी देण्याचे लेखी कबूल करण्यात आले. मात्र आता तेलंगण राज्याने एक सिंहाची जोडी मागितल्याने ही देवाणघेवाण रद्द झाली आहे. गेली सहा वर्ष सिंह देण्याची आश्वासने देत ठेंगा दाखवणा-या गुजरातमधील सक्करबाग प्राणिसंग्रहालयाला सिंह मागण्याची नामुष्की संजय गांधी राष्ट्रीय उद्यानावर ओढावली आहे. गेल्याच आठवड्यात सक्करबाग प्राणिसंग्रहालयासह ओरिसातील नंदनकनन झूओलोजिकल पार्कलाही वनविभागाने एक जोडी सिंहाच्या मागणीसाठीचे पत्र लिहिले आहे.
पर्यायी प्राणी देणार कुठून?
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सध्या केवळ तीनच वाघाटी उरले आहेत. ११ वर्षांचा नर आणि चार वर्षांच्या दोन मादी उद्यान प्रशासनाकडे आहेत. उद्यानाने देशातील पहिला वाघाटी प्रजनन प्रकल्प सुरु केला आहे. परंतु नर वाघाटी आता म्हातारा झाल्याने तो प्रजननासाठी योग्य नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. उपलब्ध वाघाटींच्या प्रजननातून नवा वाघाटी जन्माला घालण्याचा उपक्रम बंद पडला आहे. त्यात नर-मादीची जोडी इतरांना दिल्यास प्रकल्पाचा गाशाच गुंडाळावा लागेल. दोन नर सिंहच उरलेले असताना सिंहाची जोडी कुठून देणार, असाही उद्यान प्रशासनासमोर प्रश्न आहे. त्यामुळे प्राणी मिळवण्याच्या मोबदल्यात दुसरा प्राणी कुठून द्यायचा असा प्रश्न उद्यान प्रशासनाला सतावत आहे.
पिंज-यांची डागडुजी कासवगतीने
२०१५ साली कित्येक वर्षानंतर उद्यान प्रशासनाने सफारीत वाघ सोडला होता. त्यानंतर पिंज-याची दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा पर्यायी पिंज-यात वाघ पाठवला. सिंह सफारीत केवळ एकच सिंह पर्यायी पिंज-यात दाखवला जात आहे. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या नव्या नियमावलीनुसार सिंह सफारीच्या जागेची व्याप्ती वाढवण्याचे काम २०१५ साली सुरु करण्यात आले होते. मात्र सात वर्ष झाले तरीही हे काम उरकलेले नाही.
सिंह आणि वाघ सफारीच्या दुरुस्तीचे काम येत्या जून महिन्यापर्यंत पूर्ण होईल. नव्या सिंहाची जोडी मिळवण्यासाठी उद्यान प्रशासन सक्करबाग प्राणिसंग्रहालय तसेच ओरिसातील नंदनकनन प्राणिसंग्रहालयाच्या संपर्कात आहे, असे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे वनसंरक्षक आणि संचालक जी मल्लिकार्जून यांनी स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community