कोरोना काळात रेल्वे सेवा बंद होती, पण त्यानंतर जेव्हा निर्बंध शिथिल करण्यात आले तेव्हा प्रवाशांची संख्या वाढली आणि रेल्वे अपघातांत वाढ झाली. रेल्वे प्रवासात 2021 मध्ये 1 हजार 300 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. 2020 च्या तुलनेत जवळपास 300 अपघात वाढले. यामध्ये सर्वाधिक मृत्यू रेल्वे रुळ ओलांडताना झाले आहेत.
या कारणाने सर्वाधिक मृत्यू
नवी मुंबईत ट्रान्स हार्बर, तसेच हार्बर रेल्वेमार्गाभोवती सुरक्षा भिंत बांधण्यात आली आहे. मात्र तरीही प्रवाशांकडून जागोजागी रेल्वे रूळ ओलांडण्याचे शॉर्टकट तयार झाले आहेत. स्थानकाचा प्रवेशद्वार मार्ग न वापरता थेट फलाटावर ये-जा करण्यासाठी अथवा रुळाच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी जीव धोक्यात घातला जातो. अशा ठिकाणावरून रेल्वे प्रवाशांकडून दिवस-रात्र रूळ ओलांडले जात असल्याने, रेल्वेची धडक लागून प्रवासी मृत्यू होण्याचे अथवा जखमी होण्याचे प्रकार वाढले आहेत.
( हेही वाचा: उच्च न्यायालय म्हणालं, ‘सार्वजनिक सुट्टी मागणं कायदेशीर अधिकार नाही’ )
आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ
मध्य आणि पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावर आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. 2020 मध्ये 27 जणांनी तर 2021 मध्ये 54 जणांनी आत्महत्या केली आहे. लोहमार्ग पोलीस आयुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी ते डिसेंबर 2021 मध्ये एकूण 1 हजार 752 मृत्यूंची नोंद मध्य व पश्चिम रेल्वे उपनगरीय स्थानक हद्दीत झाली आहे. यामध्ये रेल्वे रुळ ओलांडताना आणि लोकल, एक्स्प्रेस गाड्यांमधून पडून झालेलेच मृत्यू अधिक आहे. अन्य मृत्यू झालेल्या घटनांमध्ये धावत्या लोकलमध्ये रुळाजवळील खाबांना प्रवासी धडकणे, रेल्वे गाडी व फलाटामधील रिकाम्या जागेत पडणे, ओव्हरहेड वायरचा शॉक लागणे, आत्महत्या, नैसर्गिक मृत्यू इत्यादीची नोंद आहे.