मुंबईतील महत्वाच्या पालिका रुग्णालयांमध्ये आणि खासगी रुग्णालये तसेच रक्तपेढ्यांमध्ये शुक्रवारी रक्ताचा तुटवडा दिसून आला. ही आव्हानात्मक परिस्थिती हाताळण्यासाठी रक्तदानाकरिता सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
म्हणून रक्ताचा तुटवडा भासतोय
वाढत्या नियमावलींच्या कचाट्यामुळेच स्वैच्छिक रक्तदात्यांची संख्या घटली आहे. कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात राहण्यासाठी जमावबंदी तसेच इतर नियमही कडक करण्यात आले आहेत. परिणामी, आता रक्ताचा तुटवडा भासत आहे. छोट्या स्तरांवर कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून स्वैच्छिक रक्तदान शिबीरे आयोजित करावीत, अशी सूचना आरोग्य विभागाच्या राज्य रक्तदान संक्रमण परिषदेने राज्यातील सर्व खासगी आणि सरकारी रुग्णालयातील रक्तपेढ्यांना दिले आहेत.
( हेही वाचा :राज्य लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर? काय आहे कारण…)
राज्य रक्तदान संक्रमण परिषदेच्या रक्तपेढ्यांना सूचना
- रक्तपेढी प्रमुखांनी स्थानिक स्तरावर संबंधित महसूल व पोलिस प्राधिकरणास संपर्क साधून रक्तदान शिबिराची गरज पटवून देत छोट्या प्रमाणात स्वैच्छिक रक्तदान शिबिरे घेण्यासाठी परवानगी घ्यावी.
- नियमित रक्तदात्यांना संपर्क करत रक्तपेढी प्रमुखांनी वेळेचे आणि तारखेचे नियोजन करावे.
- एका रक्तपेढीमध्ये रक्ताचा अतिरिक्त साठा असेल, तर अतिरिक्त साठा दुसऱ्या गरजू रक्तपेढीत पाठवला जावा.
- गृहनिर्माण सोसायटींमध्ये रक्तकेंद्रांतील रक्त संकलन पथक रक्त संकलन वाहनासहित पाठवून रक्त संकलन केले पाहिजे
- थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांचे हाल होणार नाहीत याची विशेष काळजी घ्या