मोबाईल फोनमधून पेमेंट करणारे बोगस अ‍ॅप उघड, तिघांना अटक

134

‘स्पूफ पेटीएम’ या बोगस अप्लिकेशनचा वापर करून दुकानदार, व्यापारी, व्यावसायिक आणि फेरीवाल्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका टोळीला साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे. या तिघांच्या टोळीने साकीनाका येथील एका हॉटेल व्यावसायिकाला फसवल्याचे समोर आले आहे.

मोहम्मद खलील उर्फ अनस अब्दुल कलाम शेख (२३), इब्राहिम शमसुद्दीन काझी (२७) आणि आयुष्य सुहास जगदाळे (२०) असे अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. हे तिघे ३ जानेवारी ते ६ जानेवारीपर्यंत साकीनाका येथील हॉटेल ब्यूसी मध्ये वास्तव्यास होते. ५ जानेवारी या तिघांपैकी एकाने त्याच्याजवळील मोबाईल फोनमधून पेटीएम अ‍ॅपमधून हॉटेलचे बिल भरले. त्यानंतर इतर दोघांनी ३ ते ६ जानेवारी दरम्यान हॉटेलचे ४९ हजार रुपयांचे बिल पेटीएममधून भरल्याचे सांगत त्यांना बिल भरल्याचे मोबाईलमधून दाखवले होते. मात्र हॉटेलच्या खात्यावर बिलाची रक्कम जमा न झाल्यामुळे व्यवस्थापकाला संशय आला आणि व्यवस्थापकाने साकीनाका पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी खात्री करून या तिघांना ताब्यात घेतले असता त्यांनी त्यांच्या मोबाईल फोनमध्ये पेटीएम अ‍ॅप सारखे दिसणारे स्पूफ पेटीएम अप्लिकेशनमधून बिल भरल्याचे भासवले होते. या तिघांना पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक करण्यात आली आहे.

(हेही वाचा हिंदमातासाठी बनवलेल्या टाक्या आच्छादीत करायला विसरले…)

काय आहे स्पूफि पेटीएम अ‍ॅप?

पेटीएम ऑनलाईन प्रमाणे दिसणारे हे अ‍ॅप्स गुगल प्ले स्टोर्सवर स्पूफि पेटीएम अ‍ॅप नावाने उपलब्ध आहे. हे अ‍ॅप मोबाईलच्या गुगल प्ले स्टोर्स वरून मोबाईलमध्ये डाउनलोड केल्यानंतर त्यात कुठल्याही बँकेची माहिती टाकावी लागत नाही. त्यानंतर तुम्हाला ज्या व्यक्तीला, दुकानदाराला पेमेंट करायचा असल्यास त्या दुकानदाराचे पेटीएम अ‍ॅप वर असलेले नाव टाईप केल्यावर त्या व्यक्तीचे नाव आणि नंबर त्या ठिकाणी येतो. त्यानंतर त्याला देण्यात येणारी रक्कम टाकायची आणि ओके केल्यावर तुमच्या या बोगस अ‍ॅपवर रक्कम पोहचायचे चिन्ह आणि समोरच्या व्यक्तीला रक्कम पोहोचल्याची ऑनलाईन रिसीट येते. हा बोगस अ‍ॅप्स एकप्रकारचे पेटीएमचे क्लोन आहे, पेटीएम डाउनलोड करणाऱ्याचे नाव आणि नंबर या बोगस अप्लिकेशवर येत असल्याचे समजते.

बाजारात सुळसुळाट

या बोगस स्पूफि पेटीएम अप्लिकेशनचा देशभरात सुळसुळाट झाला असून अनेक जण हे अप्लिकेशन डाउनलोड करून दुकानदार, हॉटेल व्यवसायिक आणि फेरीवाल्याची फसवणूक करीत आहे. या बोगस अप्लिकेशनचे काही व्हीडियो समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.