कोरोनाची तिसरी लाट पसरलेली असताना यापूर्वी घेतलेल्या लसींच्या दोन डोसबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यातच आता बूस्टर डोस देण्याची कार्यवाही मुंबई महापालिकेने हाती घेतली आहे. त्यानुसार आज सोमवार १० जानेवारीपासून कोविड लसीची प्रतिबंधात्मक मात्रा दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात लस घेणाऱ्या आरोग्य कर्मचारी, आघाडीवरील कर्मचारी आणि साठ वर्षे वयावरील सहव्याधीग्रस्त नागरिकांना हा बूस्टर डोस दिला जाणार आहे. हा डोस दुसरी मात्रा घेतल्यांच्या तारखेपासून ९ महिने किंवा ३९ आठवडे पूर्ण झालेल्यांनाच हा डोस दिला जाणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शासकीय, महानगरपालिका तसेच खासगी लसीकरण केंद्रांवर सोमवार, १० जानेवारी २०२२ पासून आरोग्य कर्मचारी, आघाडीवरील (फ्रंटलाईन) कर्मचारी आणि ६० वर्षांवरील सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना कोविड लसीची प्रतिबंधात्मक मात्रा मिळणार आहे.
थेट येवून नोंदणी करून मिळणार बूस्टर डोस
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार आणि कोविड-१९ वर्किंग ग्रुप ऑफ नॅशनल टेक्निकल ॲडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन, तसेच स्टँडिंग टेक्निकल सायन्टीफीक कमिटी यांच्या निर्देशानुसार हे लसीकरण सुरू होणार आहे. मुंबईतील सर्व शासकीय, महानगरपालिका तसेच खासगी लसीकरण केंद्रांवर ऑनलाइन नोंदणी तसेच थेट येवून नोंदणी पद्धतीने ही सुविधा उपलब्ध असेल.
कधी घ्याल बूस्टर डोस?
कोविड लसीचे दोन्ही डोस घेतलेले आरोग्य कर्मचारी, आघाडीवर (फ्रंटलाईन) काम करणारे कर्मचारी, तसेच ६० वर्षे वा त्यावरील सहव्याधी असलेले नागरिक ह्यांनी दुसरी मात्रा घेतल्यांच्या तारखेपासून ९ महिने किवा ३९ आठवडे पूर्ण झाले असल्यास, ते १० जानेवारी २०२२ पासून प्रतिबंधात्मक मात्रा अर्थात प्रिकॉशन डोस घेण्यासाठी पात्र असतील.
डॉक्टरांच्या सल्ल्याने लस घेण्याबाबत निर्णय घेणे
६० वर्षे व त्यावरील वयाच्या सहव्याधी असलेल्या नागरिकांना प्रतिबंधात्मक मात्रा घेण्यासाठी लसीकरण केंद्राच्या ठिकाणी कोणतेही प्रमाणपत्र जमा करण्याचे किवा दाखवण्याची आवश्यकता नाही. मात्र, अशा व्यक्तींनी त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने लस घेण्याबाबत निर्णय घेणे आवश्यक आहे.
खासगी रुग्णालयात पालिकेने ठरवलेल्या दरात लस
शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रावर सर्व पात्र नागरिकांना विनामूल्य प्रतिबंधात्मक मात्रा देण्यात येईल. मात्र ज्या पात्र नागरिकांना खासगी लसीकरण केंद्रावर लस घ्यायची असेल, अशा नागरिकांसाठी केंद्र शासनाने पूर्वी घोषित केलेल्या किंमतीमध्येच लसीकरण केले जाईल. लसीच्या किंमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी हे आहेत नियम
सर्व आरोग्य कर्मचारी, आघाडीवर काम करणारे कर्मचारी ज्यांचे वय ६० वर्षापेक्षा कमी आहे व ज्यांची कोविन ऍपवर यापूर्वी लस घेताना कर्मचारी ऐवजी ‘नागरिक’ अशी वर्गवारी नोंद झाली आहे, अशा लाभार्थ्यांचे लसीकरण शासकीय व महानगरपालिका लसीकरण केंद्रात थेट येवून (ऑनसाइट/वॉक इन) नोंदणी पद्धतीने उपलब्ध असेल. त्यासाठी त्यांनी नोकरीच्या ठिकाणचे प्रमाणपत्र तथा ओळखपत्र सादर करणे बंधनकारक असेल. या लाभार्थ्यांना खासगी केंद्रात लस घ्यावयाची असेल तर त्यांनी शासकीय केंद्रावर येऊन प्रथम योग्य ती वर्गवारी नोंदवावी आणि नंतर खासगी केंद्रावर लस घेण्याची त्यांना मुभा असेल.
बूस्टर डोस कोणता देणार?
दुसरी मात्रा घेतलेल्या तारखेपासून ९ महिने किवा ३९ आठवडे पूर्ण झाले असल्यास, हा निकष लक्षात घेवून प्रतिबंधात्मक मात्रा दिली जाणार आहे. तसेच, संबंधित लाभार्थ्यांनी जर आधी कोविशील्ड लस घेतली असेल तर त्यांना कोविशील्ड लसीची मात्रा देण्यात येईल. ज्यांनी आधी कोवॅक्सिन लस घेतली असेल त्यांना कोवॅक्सिन लसीची मात्रा देण्यात येईल.
Join Our WhatsApp Community