मध्य रेल्वेला 66 व्या राष्ट्रीय रेल्वे पुरस्कार 2021 मध्ये प्रतिष्ठित ‘पर्यावरण’ आणि ‘स्वच्छता शिल्ड’ प्राप्त झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, नागपूर, सोलापूर स्थानके आणि कल्याणमधील सेंट्रल रेल्वे स्कूल यासारख्या इतर युनिट्स आणि फॅक्टरी युनिट्सना IGBC (Indian Green Building Council) गोल्ड प्रमाणपत्र मिळाले आहे.
शिरपेचात मानाचा तुरा
मध्य रेल्वे मुंबईच्या जनसंपर्क विभागाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, मध्य रेल्वेमध्ये एकूण 87 इको-स्मार्ट स्थानके आहेत. भारतीय रेल्वेवरील इको-स्मार्ट स्थानकांची ही सर्वाधिक संख्या आहे. डिसेंबर 2021 पर्यंत 87 टक्के इको स्मार्ट स्टेशनला ISO प्रमाणपत्र मिळाले आहे. मध्य रेल्वेच्या व्यापक वृक्षारोपण मोहिमेचा परिणाम म्हणून, रेल्वेची सुमारे 106 हेक्टर जमीन वृक्ष लागवडीसाठी वापरण्यात आली आहे. यामध्ये गेल्या 6 वर्षात सुमारे 25 लाख रोपांची लागवड करण्यात आली आहे. मध्य रेल्वेनेही प्रभावी जल व्यवस्थापनाच्या दिशेने अनेक पावले उचलली आहेत. रेनवॉटर हार्वेस्टिंग युनिट्समुळे पाण्याच्या वापरात 12.86 टक्क्यांनी बचत झाली आहे. ऑटोमॅटिक कोच वॉशिंग प्लांट, सीवेज ट्रीटमेंट प्लांट, वॉटर सायकलिंग प्लांट आणि एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांटमुळे दररोज 10 दशलक्ष लिटर पाणी तयार करण्याची क्षमता निर्माण झाली आहे.
पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी मध्य रेल्वेने नुकतेच माथेरान रेल उत्सवाचे आयोजन केले होते. माथेरान लाइट रेल्वे हा सांस्कृतिक लँडस्केप म्हणूनही प्रक्षेपित करण्यात आला. सांस्कृतिक भूदृश्यांचे संरक्षण आणि व्यवस्थापनासाठी UNESCO ग्रीस मेलिना मर्कोरी आंतरराष्ट्रीय पुरस्कार-2021 साठी देखील याची शिफारस केली जात आहे.
( हेही वाचा :रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटले, कोरोना रुग्णांचा आकडा दोनलाख पार )
मध्ये रेल्वेची कामगिरी
- 106 हेक्टरमध्ये वृक्ष लागवड
- 87 इको स्मार्ट स्थानके (67 स्थानकांना आयएसओ)
- भुसावळ कम्पोस्टिंग प्लांट
- लोणावळा कम्पोस्टिंग मशिनद्वारे सेंद्रिय कच-याचे खतामध्ये रुपांतर
- सीएसएमटी, नागपूर, सोलापूर आणि कल्याण (वर्कशाॅप युनिटसारख्या इतर युनिटना आयजीबीसी सुवर्ण प्रमाणपत्र )