राज्यातील एसटी कामगार कृती समितीच्या सर्व कामगार नेत्यांसोबत आज एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या सोबत बैठक झाली. त्यानंतर कामगारांनी नेत्यांनी पत्रकार परिषदेत सकारात्मक भूमिका घेत संपकरी कामगारांना पुन्हा कामावर रुजू होण्यासाठी आवाहन केले.
कामगारांच्या संसाराची होतेय राखरांगोळी!
या बैठकीनंतर कामगार संघटनांच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन कामगारांना आवाहन केले. आजच्या बैठकीला सर्व कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते, ज्यांनी संपाची नोटीस दिली त्या कामगार संघटनेचे नेतेही उपस्थित होते. विलीनीकरणाची लढाई न्यायालयावर सोडा, असे आम्ही आवाहन करतो, या संपामुळे एसटीमध्ये कंत्राटी कामगार येऊ लागले आहेत, कंत्राटी गाड्या येऊ लागल्या आहेत, यामुळे हजारो कामगारांच्या संसाराची राख रांगोळी होणार आहे, त्यापासून वाचायचे असेल तर कृपया कामावर हजर व्हा, असे महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे म्हणाले. या बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे स्वतः उपस्थित होते, त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवा आणि कामावर रुजू व्हा, असे आवाहन शिंदे यांनी केले. आम्ही संपाची नोटीस दिलेली नाही, पण संपावर असलेल्या कामगारांनाही कामावर रुजू होण्याचे आम्ही आवाहन करत आहे. सर्व कामगार संघटना त्यांच्या त्यांच्या सदस्यांची जबाबदारी घेत आहे, असेही शिंदे म्हणाले.
(हेही वाचा एसटीच्या संपावर शोधला रामबाण उपाय! जाणून घ्या कोणता?)
कामगारांनी कामावर रुजू व्हावे
या बैठकीत आम्हाला शरद पवार आणि मंत्री अनिल परब यांनी सकारात्मक आश्वासन दिले आहे. विलीनीकरणाचा मुद्दा न्यायालयावर सोडणे योग्य आहे, तसेच संपावर असलेल्या कामगारांवर कोणतीही कारवाई करणार नाही, असेही आश्वासन मंत्र्यांनी दिले आहे, त्यामुळे कामगारांनी कामावर हजर व्हावे, असे कामगार नेते श्रीरंग बर्गे यांनी यावेळी केले.
Join Our WhatsApp Community