गेल्या ३ वर्षांपासून म्हाडाने घराची सोडत काढलेली नाही. परंतु मुंबईकरांची प्रतीक्षा आता लवकरच समाप्त होणार आहे. यंदाच्या वर्षी जुलै महिन्यात जवळपास ४ हजार घरांसाठी म्हाडा लॉटरी निघणार आहे. यात अत्यल्प गटासाठी बहुतांश घरे असणार आहेत. मुंबईत हक्काचे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. यासाठीच राज्य सरकार म्हाडा अंतर्गत सर्वसामान्य लोकांना माफक दरात घरे उपलब्ध करून देते. २०१८ मध्ये म्हाडाने सोडत काढली त्यावेळी केवळ २१८ घरे होती. पण आता ४ हजार घरे असतील जुलैमध्ये लॉटरी निघणार असून ऑक्टोबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
४ हजार घरांसाठी सोडत
गोरेगाव येथील पहाडी भागात वन रुम किचन स्वरुपात ही घरे असणार आहेत. ४ हजार घरांपैकी अत्यल्प उत्पन्न गटासाठी २ हजार घरे राखीव असणार आहेत. २३ मजल्यांच्या सात इमारतींमध्ये १ हजार २३९ घरे उपलब्ध असतील. उन्नतनगर भागात अत्यल्प उत्पन्न गटासाठी ७०८ घरे, अल्प उत्पन्न गटासाठी ७३६ घरे, मध्य उत्पन्न गटासाठी २२७ तर, उच्च उत्पन्न गटामध्ये १०५ घरांचा समावेश असेल. तर, अँटॉप हिल, कन्नमवारनगर तसेच दक्षिण मुंबईतल्या काही भागात म्हाडाची जवळपास १ हजार घरे उपलब्ध आहेत.
हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार
कोरोनामुळे संपूर्ण यंत्रणा ठप्प झाल्यामुळे जवळपास ३ वर्षांनंतर म्हाडाने या लॉटरीची घोषणा केली आहे. तसेच घरांची संख्याही यंदा अधिक असल्यामुळे लवकरच अनेक लोकांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. जुलैमध्ये ही सोडत निघणार असल्यामुळे सात महिने वाट बघावी लागणार आहे. म्हणजेच मुंबईकरांना घर घेण्यासाठी तयारीला पुरेसा वेळ मिळणार आहे.
Join Our WhatsApp Community