स्वातंत्र्यवीर सावरकर आर्चरी अकादमीच्या तिरंदाजांनी उरण येथे झालेल्या द्रोणागिरी क्रीडा- द्रोण चषक आणि युवा महोत्सवात घवघवीत यश संपादन केले आहे. तिरंदाजांनी ६ जानेवारी २०२२ रोजी उरण येथे झालेल्या स्पर्धेत विविध प्रकारात एकूण ५ पदके जिंकली आहेत. २००९ पासून दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात, प्रशिक्षक स्वप्निल परब यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक मुलं-मुली आर्चरीचे प्रशिक्षण घेत आहेत.
तिरंदाजांनी जिंकली ५ पदके
द्रोणागिरी क्रीडा- द्रोण चषक आणि युवा महोत्सवाचे आदिती तटकरे यांच्या शुभहस्ते उद्घाटन झाले होते. यात विविध देशी-विदेशी अशा १३२ हुन अधिक स्पर्धांचा समावेश होता. स्वातंत्र्यवीर सावरकर आर्चरी अकादमीच्या तिरंदाजांनी यात ५ पदके जिंकली, अशी माहिती प्रशिक्षक स्वप्निल परब यांनी दिली आहे. रिकर्व्ह राऊंड महिलांच्या वरिष्ठ गटात अदिती म्हात्रे हीने रौप्य पदक, नोव्हॉईस कॅटेगरी भारतीय फेरी (पुरुष) या गटात व्यंकटेश बकाले याने सुवर्ण, भारतीय फेरी (महिला) या गटात अनुक्रमे छाया आनंद, ऐश्वर्या महाडिक यांनी रौप्य व कांस्य पदक जिंकले आहे. तर श्वेता गोडसे आणि रितिका या तिरंदाज चौथ्या स्थानावर आहेत. असे प्रशिक्षक परब यांनी स्पष्ट केले आहे.
( हेही वाचा : कोविड बाधितांना पालिकेच्या ‘वॉर्ड वॉर रूम’चा आधार! ‘हे’ आहेत विभागीय संपर्क क्रमांक )
विजेत्या खेडाळूंचे अभिनंदन करत, आता येणाऱ्या वर्षातील स्पर्धांसाठी मुलं तयारी करत आहेत. अदिती म्हात्रे ही खेलो इंडियासाठी तयारी करत असून, ऑल इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धांसाठीही तिरंदाज विशेष तयारी करत आहेत, असेही प्रशिक्षकांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community