मध्य प्रदेशात उभारणार १०८ फुटांचा आदी शंकराचार्यांचा पुतळा…

129

मध्य प्रदेशातील ओंकारेश्वरमध्ये 2 हजार कोटी रुपये खर्चून आदि शंकराचार्यांची 108 फूट उंचीची मूर्ती उभारण्याची तयारी सरकार करत आहे. येथे एक म्युझियमही उभारण्यात येणार आहे. मध्य प्रदेश सरकार आधीच 2.5 लाख कोटी कर्जाच्या ओझ्याखाली आहे. राज्य सरकारच्या एकूण अर्थसंकल्पापेक्षा जास्त कर्ज असताना हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गेल्या आठवड्यात आचार्य शंकर सांस्कृतिक एकता न्यासच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत या प्रकल्पावर चर्चा करण्यासाठी संबोधित केले होते. या बैठकीला स्वामी अवधेशानंद गिरीजी महाराज यांच्यासह मान्यवर संत आणि ट्रस्टचे सदस्य उपस्थित होते.

राज्याला जगाशी जोडण्याचा प्रयत्न

ओंकारेश्वर येथील आदिशंकर संग्रहालय आणि आंतरराष्ट्रीय वेदांत संस्थेचा 108 फूट बहु-धातूचा पुतळा उभारण्याचा प्रकल्प राज्याला जगाशी जोडेल, असे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे. आतापर्यंतच्या योजनेनुसार मूर्तीची उंची 108 फूट असून ती 54 फूट उंचीच्या मचाणावर उभारण्यात येणार आहे. मांधाता पर्वतावर 7.5 हेक्टर जागेत मूर्ती आणि शंकर संग्रहालय उभारले जाणार आहे. नर्मदा नदीच्या पलीकडे पाच हेक्टर क्षेत्रात गुरुकुलम विकसित केले जाईल. यासोबतच आचार्य शंकर इंटरनॅशनल अद्वैत वेदांत संस्थान १० हेक्टर क्षेत्रात विकसित करण्यात येणार आहे.

हा आहे उद्देश

याबाबत सीएम चौहान म्हणाले की, ओंकारेश्वरमध्ये शंकराचार्यांच्या पुतळ्याची स्थापना हा व्यावहारिक वेदांत जीवनात आणणारा प्रकल्प आहे. ते म्हणाले की, हे जग एक कुटुंब होऊ दे, हा त्यामागचा उद्देश आहे. ट्रस्टच्या सदस्यांनी दिलेल्या सूचनांची राज्य सरकार अंमलबजावणी करेल आणि संपूर्ण कृती आराखडा अंतिम करण्याचे काम वेगाने केले जाईल, असे शिवराजसिंह चौहान म्हणाले.

( हेही वाचा: कैद्यांना कोरोनानं घेरलं! आर्थर रोड तुरुंगातील २८ जणं बाधित )

राज्य कर्जाखाली दबले आहे

काँग्रेसने या प्रकल्पावर शंका उपस्थित केली आहे. राज्यावर असलेल्या प्रचंड कर्जाकडे काँग्रेसने लक्ष वेधले आहे. मध्य प्रदेश सरकार आधीच 2.5 लाख कोटी कर्जाच्या ओझ्याखाली आहे. राज्य सरकारच्या एकूण अर्थसंकल्पापेक्षा जास्त कर्ज असताना हा प्रस्ताव आला आहे. राज्याचा अर्थसंकल्प 2.41 लाख कोटींचा असला तरी एकूण कर्ज 2.56 लाख कोटी आहे. राज्यातील प्रत्येक व्यक्तीवर 34 हजार रुपयांचे कर्ज आहे. कर्जाबाबत श्वेतपत्रिका काढण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.